विजेच्या धक्क्याने लघुशंकेला गेलेल्या ग्राम पंचायत शिपायाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 02:17 PM2019-07-20T14:17:38+5:302019-07-20T14:18:21+5:30
पुनाळ गावातील हृदयद्रावक घटना
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील शंकर चव्हाण विद्यामंदिरात शनिवारी शालेय व्यवस्थापन समितीची मिटींग सुरू होती. या बैठकीनंतर लघुशंकेसाठी गेलेले पालक समितीचे सदस्य दशरथ हनमंत वडर (वय ३९ रा. पुनाळ) यांना विद्युत महावितरणच्या डीपीतून विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. नातेवाईकांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती.
याबाबत समजलेली माहिती अशी, पुनाळ गावातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून काम करणारे दशरथ वडर हे गावातील शंकरा चव्हाण विद्यामंदिरात पालक सदस्य होते. शनिवारी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची मिटींग बोलावली होती. त्यामुळे दशरथ वडर मिटींगला हजर झाले होते. त्यांनी मिटींगमध्ये अनेक सूचना मांडल्या. सकाळी ९ वाजता मिटींग संपल्यानंतर शाळेजवळच्या स्वच्छतागृहाशेजारी वडर लघुशंकेसाठी गेले होते.
ते ज्या ठिकाणी उभारले होते. तेथून जवळच विद्युत महावितरणचा डी.पी. होता. वडर यांना विजेचा धक्का बसल्याने ते जागीच बेशुध्द पडले. शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दशरथ यांना विजेचा धक्का बसल्याची माहिती गावातील प्रमुख लोक व नातेवाईकांना समजल्यावर ते तातडीने रुग्णालयात दाखल झाले. सीपीआरमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी जमा झाली होती. दशरथ यांच्या पश्याच आई- वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.