निकालादिवशीच नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू : इंदूमती गर्ल्समध्ये घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:11 AM2018-05-03T01:11:54+5:302018-05-03T01:11:54+5:30
कोल्हापूर : नववी पास होऊन दहावीत नक्की जाणार अशी तिला खात्री होती. त्याच आनंदात ती निकाल आणावयास गेली.
कोल्हापूर : नववी पास होऊन दहावीत नक्की जाणार अशी तिला खात्री होती. त्याच आनंदात ती निकाल आणावयास गेली. गल्लीत सगळ््यांना पेढे घेवून येते बघा, असेही सांगून गेली, परंतु नियतीने तिच्या जीवनात हा पेढे वाटण्याचा आनंद येऊ दिला नाही. शाळेत चक्कर आल्याचे निमित्त होऊन तिचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवारी सकाळी निधन झाले. मृदुला संतोष गुरव (वय १३, रा. गुरव गल्ली, बिनखांबी गणेश मंदिराजवळ कोल्हापूर) असे तिचे नाव.
कोल्हापुरातील त्र्यंबोली, रंकोबा, जोतिबा, महाकाली, फिरंगाई आदी देवस्थानचे पारंपरिक गुरव म्हणून संतोष गुरव काम पाहतात. त्यांची मृदूला ही मुलगी. नवरात्रौत्सवात त्र्यंबोली देवीच्या ललिता पंचमी सोहळ्यात मृदूलाला तीन वर्षे कोहळा पूजनाचा मान मिळाला होता. ती इंदूमती देवी गर्ल्स हायस्कूलमध्ये नववीत शिकत होती. सध्या तिची दहावीची तयारी सुरू होती. निकाल आणण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शाळेत गेल्यानंतर तिला चक्कर आली. शिक्षकांनी तत्काळ तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले व पालकांना बोलावून घेतले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. घरांतून जाताना हसत खेळत आनंदात गेलेल्या मुदृलाचे दुपारी पार्थिवच घरी आले. हा धक्का तिच्या कुटुंबियांसह वर्गातील मैत्रिणींनाही सहन झाला नाही. सारेजण धाय मोकलून रडत होते.
तिला लहानपणी हृदयविकाराचा त्रास झाला होता. परंतु हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचे जीवन सुलभ झाले होते. प्रकृतीही उत्तम होती. त्यामुळे नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला होणाऱ्या त्र्यंबोली देवीच्या यात्रेत प्रचंड गर्दीतही कोहळा पूजनाच्या कार्यक्रमास ती हौसेने गेली तीन वर्षे उपस्थित राहत असे. तिच्या हस्तेच हा सोहळा होई. एका देवीशी संबंधित धार्मिक विधी मृदूला करत होती व तिचे लोकांनाही अपू्रप वाटायचे. त्यामुळे तिच्या अशा अचानक निधनाने अनेकांच्या मनाला चटका बसला.
मृदूला नववीत पास..
मृदूला नववीतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे परंतु हा निकाल पाहायला ती आज या जगात नाही. तिच्या मागे आजी, आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.