शेतात मशागत करताना कठडा नसलेल्या विहिरीत पडून बैलजोडीचा मृत्यू, कोल्हापुरातील पिंपळवाडीत घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:15 PM2023-03-22T12:15:55+5:302023-03-22T12:49:57+5:30
पहिल्यांदाच औताला जुंपला होता बैल. अन् घडली दुर्दैवी घटना
भोगावती : मौजे पिंपळवाडी (ता. राधानगरी) येथे आनंदा मारुती पोपले व एकनाथ महादेव जाधव या शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सोनं पिकवणाऱ्या सर्जा-राजाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने पोपले आणि जाधव यांच्या घरातच नाही, तर अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.
आनंदा पोपले आणि एकनाथ जाधव यांच्या पडीत असणाऱ्या शेतात मशागत सुरू करताना कठडा नसलेल्या विहिरीकडेला काटाळी मारताना औताचा एक बैल कठडा नसलेल्या विहिरीत पडला आणि सापती न तुटल्याने दुसराही बैल त्याच्याबरोबर विहिरीतील पाण्यात ओढला गेला आणि दोन्ही बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अत्यंत उमद्या बैलजोडीचा अशा पद्धतीने मालकासमोरच दुर्दैवी मृत्यू होणे म्हणजे शेतकऱ्याच्या नशिबाची परीक्षाच दैव घेते आहे, असा प्रकार म्हणावा लागेल. आनंदा पोपले या शेतकऱ्याने आपला बैल रविवारीच आणलेला होता आणि आज सकाळी पहिल्यांदाच औताला जुंपलेला होता.