कोल्हापुरातील कसबा बावड्यात डेंग्यूमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू, महापालिका आरोग्य प्रशासन सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:38 PM2023-08-05T12:38:12+5:302023-08-05T12:38:31+5:30
विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पथकाची भेट
कोल्हापूर : कसबा बावड्यातील बिरंजे पाणंद येथील ज्योतिरादित्य जयसिंह नाईक (वय १८) या विद्यार्थ्याचा गुरुवारी डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर महापालिका आरोग्य प्रशासन सतर्क झाले. पहिल्या टप्प्यात कसबा बावड्यातील एक हजार कुटुंबांचे डेंग्यूचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
शुक्रवारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, साथरोग नियंत्रण अधिकारी निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाईक यांच्या घरी भेट दिली. भेटीत नातेवाइकांकडून नाईक यांच्या उपचाराची माहिती घेतली. त्यामध्ये ज्योतिरादित्य याला ताप आल्यानंतर २५ रोजी खासगी दवाखान्यात तपासणी करून घेतली. औषधानंतर ताप कमी झाला. पुन्हा ताप आल्यानंतर डेंग्यूच्या चाचण्या करून घेण्यात आल्या. प्लेटलेटची तपासणी केल्यानंतर ते १ लाख ५९ हजार असल्याचे समोर आले. यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. उपचारावेळी त्याच्या मेंदूतही रक्तस्राव झाल्याचे समोर आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिका आरोग्य पथकास दिल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, आरोग्य पथकाने तातडीने बिरंजे पाणंद परिसराची पाहणी केली. या परिसरातील १५९ कुटुंबांतील ५३ जणांची तपासणी करण्यात आली. डास प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत. परिसराची स्वच्छता करण्यात आली. डेंग्यूचा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात तयार होतो. खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एकवेळा कोरडी करून घासून पुसून स्वच्छ करून ठेवावीत. एक दिवस कोरडा दिवस पाळावा. नारळाच्या करवंट्या, न वापरातील डबे, टायरची वेळीच विल्हेवाट लावावी. झाडांच्या कुंडया, फ्रीजच्या मागील ट्रेमध्ये पाणी साचू देऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले.
डेथ ऑडिट होणार
ज्योतिरादित्य नाईक या विद्यार्थ्याचा मृत्यू डेंग्यूनेच झाला आहे. त्याने उपचारादरम्यान केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. तरीही त्याच्या मृत्यूचे सविस्तर डेथ ऑडिट होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या जिल्हास्तरीय पथकाकडून ऑडिट होणार आहे.