Crime News kolhapur: 'सावकार' म्हणण्यांचा वाद जीवावर बेतला, चाकूहल्यातील जखमीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 07:06 PM2022-06-25T19:06:34+5:302022-06-25T19:29:15+5:30
हिशेबाचे पैसे मोजताना मित्र संदीप मानेने ‘सावकार’ म्हणून हाक मारली. या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली.
कोल्हापूर : 'सावकार' म्हणून हाक मारली म्हणून तरूणाला धारदार चाकूने भोकसले. सोनतळी (ता. करवीर) येथे झालेल्या या चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी तरुणाचा उपचार सुरू असताना सीपीआरमध्ये आज, शनिवारी सकाळी मृत्यू झाला. भरत शंकर नाईक (वय २९, केर्ली, ता. करवीर) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी मयताचा मित्र संदीप बापू माने (रा. सोनतळी, करवीर) या संशयितास पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भरत नाईक हा गवंडी काम करत होता. तो लक्षतिर्थ वसाहत येथील रहिवासी आहे. गवंडी कामासाठी केर्ली (ता. करवीर) येथे तो भाडेकरू म्हणून राहत होता. काल, शुक्रवारी रात्री रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भरत हा सोनतळी येथे हिशेबाचे पैसे मोजत उभा होता. त्यावेळी त्यांचा मित्र संदीप माने त्याला ‘सावकार’ म्हणून हाक मारली. या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली.
वाद मिटविण्यासाठी भरत याला माने यांच्या घराजवळ बोलवून घेतले. त्यावेळी माने याने भरत नाईक यांच्यावर चाकूहल्ला केला. हल्ल्यात भरत यांच्या पोटावर व मानेवर गंभीर दुखापत झाली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे नागरिक जमा झाले. त्यांनी भरतला उपचारासाठी सीपीआर दाखल केले.
दरम्यान, करवीर पोलिसांनी तातडीने संशयित हल्लेखोर मानेला ताब्यात घेतले. त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही नोंदवला. दरम्यान, उपचार सुरू असताना आज शनिवारी सकाळी भरत नाईक यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संशयित माने याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला.