कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सातारच्या कैद्याचा मृत्यू, बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी भोगत होता शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:55 PM2023-01-18T15:55:22+5:302023-01-18T15:55:57+5:30
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
कोल्हापूर : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मंगळवारी (दि. १७) दुपारी मृत्यू झाला. आझम कासम शेख (वय ५४, मूळ रा. कुरेशी नगर, फलटण, जि. सातारा) असे मृत कैद्याचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आझम शेख याला सातारा पोलिसांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी अटक केली होती. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याला सातारा न्यायालयाने १० वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. ९ मार्च २०२२ रोजी शेख याला कळंबा कारागृहात स्थलांतरित केले होते.
अशक्तपणा आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने गुरुवारी (दि. १२) त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.