गवा रेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू, झुंजीमुळे पाच गुंठ्यातील ऊस पिकाची नासधूस; पन्हाळ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 03:59 PM2022-05-13T15:59:14+5:302022-05-13T16:43:28+5:30
गव्यांच्या झुंजीमुळे त्या ठिकाणचा सुमारे पाच गुंठ्यातील ऊस पिकाचे नुकसान
बाजारभोगाव : दोन गवा रेड्यांच्या झुंजीत एका गवा रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव जवळील पोहाळे तर्फ बोरगाव या दोन्ही गावांच्या हद्दीत तानाजी सावू पाटील यांच्या शिव नावाच्या शेतात ही घटना आज, शुक्रवारी सकाळी घडली. गव्यांच्या झुंजीमुळे त्या ठिकाणचा ऊस भुईसपाट झाला आहे. सुमारे पाच गुंठ्यातील ऊसाच्या पिकाची नासधूस झाली.
आज, सकाळी शेतीकामासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ वनकर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. याघटनेची माहिती मिळताच वनपाल नाथा पाटील, वनरक्षक कुंडलीक कांबळे, महादेव कुंभार, संगिता देसाई, वनमजूर बाळू म्हामुलकर, नाथा पाटील, यशवंत पाटील, शंकर पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता गव्यांच्या अंगावर शिंग लागल्याच्या खुणा आढळल्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत रानभरे यांनी मृत गव्याची तपासणी केली.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढला आहे. अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. दोन दिवसापुर्वीच पन्हाळ्याच्या दक्षिण बाजूकडील पायथ्याशी असलेल्या वाघवेजवळच्या डोंगरात तीस गव्यांचा कळप नागरिकांच्या निदर्शनास आला होता. गव्यांकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे.