Kolhapur: पत्नीने विष पाजलेल्या नूलच्या 'त्या' जवानाची मृत्यूशी झुंज व्यर्थ, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:26 AM2024-08-05T11:26:35+5:302024-08-05T11:30:11+5:30

आज अंत्यसंस्कार 

Death of jawan Amar Bhimgonda Desai of Gadhinglaj taluka kolhapur who was poisoned by his wife | Kolhapur: पत्नीने विष पाजलेल्या नूलच्या 'त्या' जवानाची मृत्यूशी झुंज व्यर्थ, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल

Kolhapur: पत्नीने विष पाजलेल्या नूलच्या 'त्या' जवानाची मृत्यूशी झुंज व्यर्थ, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल

गडहिंग्लज : पंधरा दिवसांपूर्वी हात-पाय व डोळे बांधून प्रियकराच्या मदतीने पत्नीने विष पाजलेल्या जवानाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली. पुणे येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान सतराव्या दिवशी शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

अमर भीमगोंडा देसाई (वय ३९, रा. कसबा नूल, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे त्या दुर्दैवी जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या जन्मगावी नूल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अधिक माहिती अशी, जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावणारे जवान देसाई हे सुटीवर गावी आले होते. दरम्यान, १८ जुलै २०२४ रोजी रात्री येथील पाटणे सिमेंट पाइप कारखान्याजवळील आपल्या बंगल्यात ते झोपले होते. त्यावेळी पत्नी तेजस्विनी व तिचा प्रियकर सचिन परशराम राऊत (रा. हेब्बाळ, कसबा नूल) या दोघांनी त्यांच्यावर जबरदस्तीने विषप्रयोग केला.

झोपेतून खडबडून जागे झालेल्या अमर यांच्या आरडाओरड्याने घटनास्थळी जमलेल्या शेजारच्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथील उपचारानंतर त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात पाठविले. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते.

वारंवार भांडण काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या सहकार्याने अमरला विष पाजल्याची कबुली तेजस्विनी हिने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. त्यावरून तिच्यासह तिचा प्रियकर सचिनवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, १९ जुलै २०२४ रोजी संशयित सचिन राऊत यानेही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असून त्याची प्रकृतीदेखील चिंताजनक असून जवानाची पत्नी न्यायालयीन कोठडीत आहे.

बनावाचा प्रयत्न फसला !

जवान अमर देसाई यांनी स्वत:च विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे, असे भासवण्याचा तेजस्विनी व तिच्या प्रियकराचा प्रयत्न होता; परंतु, अमर यांच्या आरडाओरड्याने आजूबाजूचे नागरिक तातडीने घटनास्थळी आले. त्यांनीच दरवाजा तोडून अमर यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. दरम्यान, मदतीसाठी धावलेल्या संतोष खाडे यांच्यावरही सचिनने घरातून पळून जाताना हल्ला केला होता. केवळ शेजाऱ्यांच्या जागरूकतेमुळेच ही घटना उघडकीस आली.

‘तिची’ सावलीदेखील नको...!

गेल्या आठवड्यापासून जवान अमर यांचे बोलणे बंद झाले होते. त्यापूर्वी त्यांनी 'माझ्या पेन्शनची रक्कम मुलांना आणि वडिलांना द्या. मुलांना आणून भेटवा; परंतु सासरच्या कुणाचीही भेट नको, पत्नीची तर सावलीदेखील माझ्यावर पडू देऊ नका,' असे त्यांनी घरच्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यानुसार त्यांचा मुलगा व मुलीला दवाखान्यात नेऊन भेटवण्यात आले, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

शाळेच्या मैदानावर अंत्यसंस्कार

रविवारी अंत्यसंस्काराच्या पूर्वतयारीसाठी गावकऱ्यांची खास बैठक झाली. आज, सोमवारी पार्थिव पुण्याहून जन्मगावी नूलला आणण्यात येणार आहे. गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सकाळी नऊ वाजता लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर गावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Death of jawan Amar Bhimgonda Desai of Gadhinglaj taluka kolhapur who was poisoned by his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.