Kolhapur: लग्नाच्या आदल्यादिवशी वराचा मृत्यू, गडहिंग्लज तालुक्यातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:41 IST2025-01-29T12:38:30+5:302025-01-29T12:41:22+5:30
घरच्या मंडळींना धक्का

Kolhapur: लग्नाच्या आदल्यादिवशी वराचा मृत्यू, गडहिंग्लज तालुक्यातील दुर्दैवी घटना
गडहिंग्लज : लग्नाच्या आदल्या दिवशी तोल जाऊन पाय घसरून विहिरीतील पाण्यात पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सचिन शट्याप्पा बंदी (३२, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (दि. २८) ही घटना उघडकीस आली. बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातल्यामुळे भडगावसह गडहिंग्लज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामस्थ व पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी, भडगाव येथील सचिन याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे मिळेल ते काम करून घरच्यांना हातभार लावत होता. अलीकडे तो गावातील एका काजू कारखान्यात कामाला जात होता. तेथील काम कमी झाल्यामुळे तो सध्या रंगकामासाठी मजुरीला जात होता. रविवारी (दि. २६) त्याचा विवाह होता. त्यामुळे घरात लग्नाची तयारी सुरू होती.
शनिवारी (दि. २५) सकाळपासूनच त्याचे डोके दुखत होते. दुपारी बहिणीला चुलत्याच्या घरी सोडून तो घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्यामुळे घरच्यांनी पै-पाहुणे, नातेवाईक व मित्रमंडळींकडे शोधाशोध केली. परंतु, शोध न लागल्यामुळे तो बेपत्ता झाल्याची वर्दी पोलिसात देण्यात आली.
दरम्यान, मंगळवारी (दि. २८) गावातील एका विहिरीतील पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याचा भाऊ सागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
घरच्या मंडळींना धक्का
रविवारी (दि. २६) रोजी सचिन याचा विवाह असल्यामुळे घरी तयारी सुरू होती. मात्र, विवाहाच्या आदल्या दिवशी दुपारी घरातून बाहेर पडलेल्या सचिनचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने त्याच्या नातेवाइकांना मोठा धक्का बसला आहे.