विजेच्या धक्क्याने अधिकाऱ्याचा मृत्यू
By admin | Published: July 7, 2017 01:29 AM2017-07-07T01:29:21+5:302017-07-07T01:29:21+5:30
गोकुळ शिरगाव वीज उपकेंद्रातील दुर्घटना; घातपाताचा आरोप करीत नातेवाइकांचा सीपीआरमध्ये गोंधळ
लोकमत न्यूज नेटवक
कोल्हापूर : ‘महावितरण’च्या गोकुळ शिरगाव उपकेंद्रात दुरुस्ती-देखभालीचे काम करीत असताना ११ केव्ही पॉवरग्रीड एक्स्प्रेस फिडरचा धक्का बसून एका अधिकाऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत हिंदुराव जाधव (वय ४२, रा. शिवम अपार्टमेंट, जासूद गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मूळ गाव : कोतोलीपैकी घोटवडे, ता. पन्हाळा) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ‘वीज वितरण’च्या सबस्टेशन आवारात अशा पद्धतीने घटना घडल्याची जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात होते.
दरम्यान, वीज वितरणच्या सबस्टेशन-मध्ये देखभाल-दुरूस्तीचे काम सुरू असताना विद्युत प्रवाह सुरू कसा होता? असा प्रश्न मृत जाधव यांच्या नातेवाइकांनी उपस्थित करून हा घातपाताचा संशय असल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध दर्शविला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन देईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे सीपीआरमध्ये सुमारे तीन तास गोंधळ सुरू होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शशिकांत जाधव हे ‘महावितरण’कडे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ‘महावितरण’मध्ये ते सन १९९९ पासून कार्यरत होते. मुुलांच्या शिक्षणानिमित्त ते सहा महिन्यांपासून कोल्हापुरात मंगळवार पेठेत भाड्याने घर घेऊन रहात होते. गुरुवारी त्यांची सायंकाळी ६ ते दुसरे दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत ड्युटी होती. त्याप्रमाणे ते सायंकाळी ५.४५ वाजता घरातून बाहेर पडले. तोपर्यंत सायंकाळी ७ वाजता त्यांच्या मृत्यूचीच बातमी घरी धडकली. त्यांचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणल्याचे समजताच त्यांच्या पत्नी, दोन मुले, नातेवाईकांसह जासुद गल्ली तसेच घोटवडे गावातील मित्रांनी सीपीआरकडे धाव घेतली.
मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईक संतप्त झाले. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे घडल्याचा आरोप करीत या घटनेच्या चौकशीची मागणीसाठी नातेवाईकांनी सीपीआर आवारात गोंधळ घातला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
‘आयसोलेटर’मध्ये आॅईल घालताना दुर्घटना
‘महावितरण’च्या गोकुळ शिरगाव उपकेंद्रात शशिकांत जाधव यांच्यासह प्रमोद ढेरे, के. एस. कांबळे, पी. डी. भोसले, बंडू गावडे, धनाजी पाटील हे पाच सहकारी देखभाल-दुरूस्तीचे काम पाहत होते. या उपकेंद्रातील ११ हजार व्हॅट (११ केव्ही पॉवरग्रीड एक्स्प्रेस फिडर) या उच्च विद्युतदाब असणाऱ्या वाहिनीवर ‘आयसोलेटर’ (वीज प्रवाह कट करणारे उपकरण) पर्यंत विद्युत प्रवाह सुरू होता. त्यामुळे पुढे बंद असणाऱ्या विद्युत प्रवाहावर हे पाचही कर्मचारी काम करून पुन्हा बाहेर येण्याच्या तयारीत असताना शशिकांत जाधव हे ‘आयसोलेटर’मध्ये तेल घालत असताना अचानक स्पार्किंग होऊन स्फोट झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे जाधव हे विजेच्या धक्क्याने खाली कोसळले. त्यांना तातडीने ‘महावितरण’च्या वाहनातून सीपीआरमध्ये आणले. त्यांच्या शरीराचा मध्यभाग हा पूर्णपणे होरपळला होता, तर तोंडावर आणि पायावर भाजले होते, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.अधिकाऱ्यांना घेरावो; घातपाताचा आरोप
मृत जाधव याच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात आलेले वीज वितरण कंपनीचे कागल उपकार्यकारी अभियंता गणेश पोवार आणि गोकुळ शिरगांव उपकेंद्राचे प्रमुख नितीन सवाखंडे यांना घेरावो घातला. या घटनेची चौकशी केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा घेतला. देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असताना उच्चदाब वाहिनीवर विद्युत प्रवाह सुरूच कसा राहिला, हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप मृत जाधवचे मेहुणे सतीश कोठारे (रा. आसुर्ले) यांनी केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दादू पोवार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले. शासनाच्या विद्युत निरीक्षकांकडून या प्रकरणाची सखोल व नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सुमारे तीन तासांनी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
दोन दिवसांत बढती
शशिकांत जाधव हे सध्या वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांची चारच महिन्यांपूर्वी गारगोटीहून येथे बदली झाली होती. अवघ्या दोन दिवसांत त्यांना ‘प्रधान तंत्रज्ञ’ म्हणून बढती मिळणार होती पण तोपर्यंत ही दुर्घटना घडली.
नातेवाईकांचा आक्रोश
त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांनी सीपीआरकडे धाव घेतली. त्याची पत्नी, एक मुलगी, एक मुलगा तसेच दोन भाऊ, मेहुणे आदी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिटाळवणारा होता.
------------
चार महिन्यापूर्वीही घातपाताचा आरोप?
शशिकांत जाधव यांच्यासोबतचे इतर कर्मचारी कोणीही जखमी झाले नाही. दुरूस्तीचे काम सुरू असताना विद्युत प्रवाह सुरू कसा झाला? असे अनेक अनुत्तरित प्रश्न समोर आले. कर्मचारी संघटनेच्या निवडणूक वादातून एका कर्मचाऱ्याने हा घातपात घडवून आणल्याचा आरोप जाधवचे मेहुणे सतीश कोठारे यांनी पोलिसांकडे केला. चार महिन्यांपूर्वी गारगोटी येथे नोकरीस असताना त्या कर्मचाऱ्याकडून असाच घातपाताचा प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी केला.तुम्हाला बढती मिळू देणार नाही अशी धकमीही त्याने ििदल्याचा आरोप यावेळी कोठारे यांनी केला.
--..अन् ते परतलेच नाहीत
गुरुवारी सायंकाळी ड्युटीवर बाहेर पडताना शशिकांत जाधव यांनी आपल्या मुलीला वह्या आणण्यासाठी जायचे आहे, मी परत येतो तोपर्यंत तू तयार राहा’ असे आश्वासन दिले होते; पण ते घरी परतलेच नाही, त्याचा मृतदेहच परतला. त्यामुळे ती मुलगी ‘बाबा तुम्ही येणार होता’ असे सांगून रडत होती.