इचलकरंजीत दुसऱ्या लाटेतील मृत्यूसंख्या शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:51+5:302021-05-21T04:25:51+5:30
तपासणी, सूचना, बैठका सुरू मात्र पदरी अपयशच अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : देशातील सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजी ...
तपासणी, सूचना, बैठका सुरू मात्र पदरी अपयशच
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : देशातील सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजी शहराचा आहे. याकडे प्रशासन खरोखरच गांभीर्याने बघत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. दुसऱ्या लाटेत पहिल्या तीन महिन्यातच मृत्यूचा आकडा शंभरी पार गेला. मृत्यूदर कमी करण्याबाबत टास्क फोर्स कडून तपासणी, सूचना, नेत्यांच्या बैठका व प्रशासनाकडून धडपड सुरू असल्याचा आव आणला गेला. परंतु प्रत्यक्षात मृत्यूदर कमी करण्यात अद्याप तरी अपयशच आले आहे.
पहिल्या लाटेत सहा महिन्यात १९४ जणांचे मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत पहिल्या तीन महिन्यातच १०० जणांचे मृत्यू झाले. यामध्ये ३० ते ५० या वयोगटातील २४ लोकांचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे संपर्क शोधणे सध्या कागदोपत्री सुरू आहे, असे दिसते. कारण जे नगरपालिका प्रशासनाला शोधून सापडत नाहीत, ते आता रस्त्यावर सापडत आहेत. सहज मॉर्निंग वॉक करणारे दोन दिवसांत ५ पॉझिटिव्ह आढळले. रस्त्यावर विनाकारण फिरणारे तपासले तर त्यात ही ५ पॉझिटिव्ह सापडले. जर नियमानुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले आहे, तर मग हे पॉझिटिव्ह आले कोठून?
मृत्यूदर तर इतका वाढला आहे की, तो संशोधनाचा विषय बनला आहे. वेळीच उपचारासाठी दाखल न होणे हे त्यातील प्रमुख कारण आहे. त्यानंतर त्या रुग्णाला योग्य उपचार केले जातात का? वागणूक कशी दिली जाते? आजूबाजूला असलेले रुग्ण मृत्युमुखी पडले तर त्यातून निर्माण झालेल्या भयाला रोखण्यासाठी काही उपाय करता येतील का? योग्य उपचार व रुग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक स्टाफ आहे का, याबाबत कोणतीच सुधारणा होताना दिसत नाही.
केवळ चर्चा, बैठका व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात सर्व घटक गुंतलेले दिसतात. कोणाशी कोणाला देणेघेणे नाही. जे जबाबदारीने करत आहेत, त्यांची ताकद अशा बेजबाबदार व्यक्तींपुढे किती चालणार? त्यामुळे तेही हतबल झाल्याचे दिसत आहे.
कोविड केंद्रात साधी नियमित लागणारी औषधे ही उपलब्ध नाहीत. हा रोग काय नागरिकांनी आणला का? तो बळावण्यात शासनाचा ही बेजबाबदारपणा तितकाच कारणीभूत आहे. मग आता घ्या की जबाबदारी अशी लोकभावना निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच गांभीर्याने पाहावे ; अन्यथा पुढे याहूनही वाईट परिस्थिती निर्माण होईल.
चौकट
लसीकरणाच्या मागणीचे स्टेट्स
शहरात मृत्यूदर जास्त आहे. तसेच लोकसंख्या, क्षेत्रफळ याचा विचार करून प्रशासनाने ताबडतोब १८ वर्षांवरील लसीकरणास स्वतंत्रपणे सुरूवात करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत सोशल मीडियावरून संदेश पसरवून स्टेट्स, डीपी ठेवले जाते? आहेत.
प्रतिक्रिया
मृत्यूदर कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाला तत्काळ रुग्णालयात पोहचविणे सुरू आहे. तसेच रुग्णांचे संपर्क शोधून त्यांची तपासणी केली जाते आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू असून, नागरिकांनीही वेळेत उपचारासाठी दाखल व्हावे. डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी
उपाययोजना
आयजीएम रुग्णालयात रुग्णांना मानसिक धैर्य देण्यासाठी सेवाभारती केंद्रातील पद्धतीनुसार समुपदेशन व योग प्राणायाम देण्यासाठी सामाजिक संस्थांना सोबत घेऊन लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने उपक्रम राबवणे.
वॉर्डमध्ये आजूबाजूचे रुग्ण मृत झाल्यास त्याची मनात निर्माण होणारी भीती कमी करण्यासाठी दोन बेडच्या मध्ये पडदे लावणे.
रुग्णांच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलानुसार तत्काळ उपचारात बदल करणे व रुग्णाला मानसिक आधार देणे, यासाठी आवश्यक स्टाफची नियुक्ती करणे.
वेळेत रुग्ण दाखल होण्यासाठी खासगी रुग्णालयांना सक्त सूचना देणे. त्यांच्याकडून प्राथमिक उपचारात वाया जाणारा वेळ वाचवणे.
फोटो ओळी
२००५२०२१-आयसीएच-०३ १८ वर्षांवरील लसीकरण करा, अशा मागणीचे स्टेट्स सोशल मीडियावर ठेवले जाते आहेत.