कामावर असतानाच वाहतूक नियंत्रकाचा मृत्यू
By Admin | Published: May 28, 2017 05:37 PM2017-05-28T17:37:17+5:302017-05-28T17:37:17+5:30
हृदयविकाराचा धक्का : रंकाळा बसस्थानकावरील घटना
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २८ : रंकाळा बसस्थानक येथे कामावर असलेल्या वाहतूक नियंत्रकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सुनील विलासराव वरुटे (वय ५६, रा. वाघाची तालमीजवळ, उत्तरेश्वर पेठ) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, रंकाळा बसस्थानक येथे सुनील वरुटे हे वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा बजावत होते. येत्या दोन वर्षांत ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे प्रवाशांसह चालक-वाहकांशी त्यांची चांगली ओळख होती. शनिवारी रात्री जेवण करून घरातील लोकांशी रात्री एकपर्यंत बोलत बसले. त्यानंतर झोप घेऊन रविवारी पहाटे साडेपाच वाजता उठले.
अंघोळ करून चहा घेऊन सहाच्या सुमारास कामावर गेले. साडेआठच्या सुमारास अचानक भोवळ येऊन बेशुद्ध पडले. अन्य चालक-वाहकांनी त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक व मित्रपरिवाराने ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली.
वरुटे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. मुलगा आत्याकडे मुंबईला गेला होता. तो आज रेल्वेने कोल्हापूरला येणार होता. येण्यापूर्वीच त्याला वडिलांच्या निधनाची बातमी ऐकावी लागली. तो खासगी वाहनाने कोल्हापूरला येईपर्यंत मृतदेह सीपीआरच्या शवगृहात ठेवला होता. रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
भावाला शेवटचा फोन
सुनील वरुटे यांनी सकाळी रंकाळा बसस्थानक येथे गेल्यानंतर प्रवाशाकडून आंबे विकत घेतले. ते टेबलजवळ ठेवून त्यांनी मोबाईलवरून चार नंबरचा भाऊ दिगंबर वरुटे यांना फोन करून ते आंबे घरी घेऊन जाण्यास सांगितले. दिगंबर दुचाकीवरून जाऊन आंबे घेऊन घरी आले. त्यानंतर काही क्षणांतच त्यांना भाऊ सुनील यांचा मृत्यू झाल्याचे ऐकून धक्का बसला.