कोटीतीर्थ तलावात कासवाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:10+5:302021-02-23T04:38:10+5:30
कोल्हापूर : काेटीतीर्थ तलावात सोमवारी सकाळी कासव मृत होऊन पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले. वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र ...
कोल्हापूर : काेटीतीर्थ तलावात सोमवारी सकाळी कासव मृत होऊन पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले. वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्र वन विभागाने मृत कासव ताब्यात घेऊन प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राकडे पाठविले. मासेमारीच्या जाळ्यात अडकून फास लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. पाच दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे काही कासवे मृत अवस्थेत आढळून आली होती. तलावातील प्रदूषित पाणीही कारणीभूत ठरत असून येथील जलचर जीवांना धोका निर्माण झाला आहे.
सोमवारी तलावातील महादेव मंदिर परिसरात एक कासव मृत झाल्याचे व्हाईट आर्मीचे अवधूत भोसले, प्रशांत शेंडे यांना दिसून आले. त्यांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाचे समर्थ हराळे, अनिल ढोले यांनी येऊन मृत कासव तलावातून काढून विच्छेदनासाठी पाठवले. वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर त्यांनी ते ताब्यात घेतले.
चौकट
तलावातील पाणी हिरवट, दुर्गंधीयुक्त
कोटीतीर्थ तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. हिरवा तवंग आला असून परिसरात दुर्गंधी आहे. पावसाळ्यामध्ये काही दिवस पाणी स्वच्छ असते, त्यानंतर हिरवा तवंग येण्यास सुरुवात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
चौकट
तलावातील पाण्याचा निचरा होत नसून ते स्थिर असल्याने दूषित पाणी शुद्ध होण्यासाठी अडचणी आहेत. लवकरच तलावाची स्वच्छता केली जाईल. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- समीर व्याघ्रांबरे,
पर्यावरण अभियंता, कोल्हापूर महापालिका.
दारूच्या बाटल्यांचा खच
महादेव मंदिर परिसरातील तलावात प्लास्टिक पिशव्या, फुले, पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांसह दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. बंदी असतानाही जनावरे व कपडे धुतले जातात. कचराही टाकला जात असण्याची शक्यता असून तलावातील पाणी प्रदूषित होण्यास हीसुध्दा कारणे आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
फाेटो : २२०२२०२१ कोल कासव न्यूज१
ओळी : कोल्हापुरातील कोटीतीर्थ तलावात सोमवारी कासव मृतावस्थेत आढळून आले.
फोटो :२२०२२०२१ कोल कासव न्यूज२
ओळी : कोटीतीर्थ तलावात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, दारूच्या बाट्ल्यांचा खच साचला आहे.