साखरीनाटेत दोन मुलांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:10 AM2018-10-02T00:10:17+5:302018-10-02T00:10:22+5:30
राजापूर : उजेडासाठी लावलेली मेणबत्ती वितळून कौलारू घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे गावी रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
नासीर मुदस्सर दर्वेश (वय ७) आणि त्याची बहीण फातिमा (५) या अशी मृत मुलांची नावे आहेत. या मुलांचे मृतदेह पाहून मुदस्सर यांचा मित्र ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांचाही मृत्यू झाला. दोन्ही मृत मुलांचा दफनविधी सोमवारी पहाटेच करण्यात आला.
दोन-तीन दिवस साखरीनाटेत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने घरात मेणबत्ती लावून मुदस्सर दर्वेश पत्नीसह शेजारी कार्यक्रमासाठी गेले होते. नासीर आणि फातिमा ही त्यांची मुले घरातच झोपली होती. मुदस्सर यांचे वडील बाहेरील पडवीत झोपले होते. रात्री दहाच्या दरम्यान मेणबती वितळून खाली पडून अंथरुणाने पेट घेतला असावा. मुदस्सर यांचा घरातच टेलरिंग व्यवसाय असल्याने घरात मोठ्या प्रमाणावर कापड होते. या कापडाने पेट घेतला आणि घराला आग लागली. आगीच्या ज्वाळा दिसताच आजुबाजूचे लोक घटनास्थळी धावून आले. पाणी तसेच बांधकामासाठीची वाळू घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. आग आटोक्यात आल्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वजण हादरले. नासीर आणि फातिमा आगीत होरपळून मृत्यू पावले होते. त्यांचा अक्षरश: कोळसा झाला होता. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दोन्ही मृत मुलांच्या देहाचा पंचनामा करून सोमवारी पहाटे त्यांचे दफन करण्यात आले. नासीर आणि फातिमा नाटे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. त्यांच्या मृत्युमुळे हायस्कूलवरही शोककळा पसरली आहे. आमदार राजन साळवी हे कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी तेथूनच झाल्या घटनेची तत्काळ माहिती घेतली. राजापूरचे सभापती अभिजित तेली, माजी शिक्षण सभापती व जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
मानसिक धक्क्याने एकाचा मृत्यू
ही घटना पाहणारे मुदस्सर यांचे मित्र ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम रत्नागिरीला व तेथून कोल्हापूरला पुढील उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, कोल्हापूरला जाईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचाही मृतदेह नंतर साखरीनाट्याकडे आणण्यात आला.