थंडीने कोल्हापूरात दोघा फिरस्त्यांचा मृत्यू, लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:43 PM2018-12-17T14:43:48+5:302018-12-17T14:51:15+5:30
लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील फुटपाथवर झोपलेल्या दोघा फिरस्त्यांचा थंडीने मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यातील एकाची ओळख पटली असून, खंडेराव दिनकरराव कारंडे (वय ६१, रा. नंदवाळ फाटा, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. दुसऱ्याची ओळख पटलेली नाही. गेल्या चार दिवसांत शहरात थंडीचा तिसरा बळी ठरला आहे.
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील फुटपाथवर झोपलेल्या दोघा फिरस्त्यांचा थंडीने मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यातील एकाची ओळख पटली असून, खंडेराव दिनकरराव कारंडे (वय ६१, रा. नंदवाळ फाटा, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. दुसऱ्याची ओळख पटलेली नाही. गेल्या चार दिवसांत शहरात थंडीचा तिसरा बळी ठरला आहे.
शहरात फिरस्त्यांची संख्या मोठी आहे. रस्त्यावरील, बसस्टॉपवरील पिकअपशेडमध्ये हे फिरस्ते उघडेच झोपत असतात. निवारा नसल्याने थंडीमध्ये काकडत रात्र काढत असतात. रविवारचा लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरात बाजार असतो; त्यामुळे पहाटे सहापासून या ठिकाणी विक्रेत्यांची गर्दी होत होती.
एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या दोघा फिरस्त्यांना विक्रेत्यांनी उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांना वर्दी देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, ते दोघेही मृतावस्थेत होते. थंडीने गारठून मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यातील एकाच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून खंडेराव कारंडे असे मृत फिरस्त्याने नाव समजले. तर दुसऱ्याचा नाव व पत्ता समजू शकला नाही.
पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. दोघेही ६० वर्षांच्या पुढचे असल्याने लक्ष्मीपुरी परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोघेजण शहरात भिक्षा मागून उदरनिर्वाह चालवित असत.