कंटेनरखाली सापडून तरुणीचा मृत्यू
By admin | Published: February 1, 2016 12:53 AM2016-02-01T00:53:06+5:302016-02-01T00:53:06+5:30
मृत तरुणी वडणगेची; कुटुंबीयांच्या आक्रोशाने सर्व हेलावले
नवे पारगाव/पेठवडगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अंबपवाडी फाट्याजवळ कल्याणी पेट्रोल पंपासमोर कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडून तरुणीचा मृत्यू झाला. काजल तानाजी लोहार (वय २१, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. अपघात सकाळी दहाच्या सुमारास झाला. याची वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : काजल तानाजी लोहार ही उचगाव (ता. करवीर) येथील शेफ्स किचन इन्स्टिट्यूट आॅफ सॅलिनरी आर्टस् अॅँड हॉटेल मॅनेजमेंट या महाविद्यालयात पदविका प्रमाणपत्रचे शिक्षण घेत होती. रविवारी सकाळी ती आपल्या मित्राच्या मोटारसायकलवरून टोपकडून वाठारच्या दिशेने जात होती. हॉटेल पूनमच्या जवळ साताऱ्याच्या दिशेने कंटेनर (पीबी ०६ व्ही ९६४५) जात होता. काजल मित्राच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसली होती. (मित्राचे नाव व गाडीचा नंबर कळू शकला नाही.) मोटारसायकलचे हँडल कंटेनरच्या डाव्या बाजूला मागील चाकाजवळ अडकल्याने दोघेही पडले. तिचा मित्र बाजूला पडल्याने तो बचावला. काजलचा मृतदेह रस्त्यावरून ओढून बाजूला रस्त्याकडेला ठेवून तिचा मित्र मोटारसायकल घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या घरी कळविण्यात आले. वडणगेच्या देवी पार्वती हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून सेवेत असणारे वडील तानाजी लोहार व भाऊ रोहन हे घटनास्थळी आल्यावर त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
काजलसोबत असणारा मित्र कोण याची कॉल डिटेल्सवरून माहिती घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली. घनटेचा तपास हवालदार सुनील चावरे करीत आहेत. (प्रतिनिधी)