कोल्हापूर अर्बन बँकेत वाद

By Admin | Published: January 5, 2017 01:08 AM2017-01-05T01:08:53+5:302017-01-05T01:08:53+5:30

संचालक मंडळात उभी फूट : ४० लाख जादा मोजून सॉफ्टवेअरचा घाट

Debate in Kolhapur Urban Bank | कोल्हापूर अर्बन बँकेत वाद

कोल्हापूर अर्बन बँकेत वाद

googlenewsNext

विश्वास पाटील --कोल्हापूरच्या सहकारी बँकिंग क्षेत्राचे वैभव असलेल्या व राजर्षी शाहू महाराजांनीच स्थापन केलेल्या शतकमहोत्सवी कोल्हापूर अर्बन बँकेत सध्या सॉफ्टवेअर खरेदीचा वाद विकोपाला गेला आहे. तब्बल ४० लाखाहून जास्त किंमत मोजून ही खरेदी करण्यात येत असल्याने त्यास सहा संचालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळातही उभी फूट पडली आहे. खरेदीची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतही त्यावरून जोरात वादंग झाल्याचे समजते.
जुन्या-नव्या शाखांसाठी हे सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेने निविदा मागविल्या होत्या. त्यासाठी एका कंपनीकडून १ कोटी ७६ लाख व दुसऱ्या कंपनीकडून २ कोटी ३० लाख रुपयांची निविदा आली आहे. ‘कारभारी’ संचालक असलेल्या काही मंडळींचा २ कोटी ३० लाख रुपये किमतीचे सॉफ्टवेअर
घेण्याचा प्रयत्न आहे. जे सॉफ्टवेअर कमी किमतीत मिळू शकते ते जादा रक्कम मोजून आपण का घेत आहोत, अशी विचारणा करणारे पत्र संचालक उमेश निगडे यांनी बँकेला ९ व १३ डिसेंबरला दिले होते. निगडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पत्र दिल्यावर त्यांनी ‘मी तुम्हंला माहिती देण्यास बांधील नाही, तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही बँकेच्या अध्यक्षांकडून घेऊ शकता’ असे उर्मट प्रत्त्युतर दिल्याचे निगडे यांचे म्हणणे आहे. याच रागातून निगडे यांनी बँकेच्या आयटी कमिटीचाही ९ डिसेंबरला राजीनामा दिला. आता ‘कारभारी’ संचालक ४० लाख रुपये कमी करून त्याच आपल्या संबंधित कंपनीला हे सॉफ्टवेअरचे काम देण्याच्या प्रयत्नात आहेत.
बँकेला रिझर्व्ह बँकेकडून नव्याने सहा शाखा सुरू करण्याची परवानगी दिल्यावर त्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच काही संचालक ‘नोकर भरती’च्या नावाखाली पैसे गोळा करू लागल्याच्या तक्रारी आहेत. ‘सहकारातील आदर्श व्यक्तिमत्त्व’ अशी ओळख मानले जाणारे दिवंगत शामराव शिंदे असेपर्यंत पैसे घेऊन नोकरभरती असा व्यवहार बँकेत कधीच झाला नाही. त्यामुळेही नाराजी आहे. पाच-सहा लाख रुपये त्यासाठी दर काढण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे.

दृष्टिक्षेपात बँक
राजर्षी शाहू महाराज व संस्थानचे महसूलमंत्री भास्करराव जाधव यांच्याकडून १९१३ ला स्थापना.
बँकेचा शताब्दी महोत्सव १८ जानेवारी 2013ला शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न.
वार्षिक उलाढाल : ७०० कोटी
शाखा : १३
कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य
एटीएम : सात ठिकाणी
स्वनिधी : १०० कोटी
निव्वळ नफा : ७ कोटी
भांडवल पर्याप्तता प्रमाण : २३.०५ टक्के (निकषांहून चांगले)
लेखापरीक्षक वर्ग : सतत ‘अ’


गीता जाधव यांचा राजीनामा
बँकेतील चुकीचा व्यवहार मान्य न झाल्याने गीता रणजित जाधव यांनी संचालकपदाचा राजीनामा यापूर्वीच दिला आहे, परंतु तो मंजूर झाला नसल्याचे सांगण्यात आले.
नऊ विरुद्ध सहा
बँकेचे एकूण १५ संचालक असून त्यामध्ये अध्यक्ष जयसिंगराव माने, शिरीष कणेरकर, माजी महापौर पी. टी. पाटील, नामदेव कांबळे, राजन भोसले, मधुसूदन सावंत, बाबासाहेब मांगुरे, रवींद्र धर्माधिकारी आणि सुमित्रा शिंदे एका बाजूला, तर माजी महापौर शिवाजीराव कदम, उमेश निगडे, सुभाष भांबुरे, यशवंतराव साळोखे, विश्वासराव काटकर आणि गीता जाधव हे दुसऱ्या बाजूला अशी विभागणी झाली आहे.
सॉफ्टवेअर कशासाठी..
आता बँकेचे स्वत:चे डाटा सेंटर आहे. त्यामुळे देशातील सर्व बँकांची एटीएम या बँकेशी जोडलेली आहेत; परंतु वाढती स्पर्धा विचारात घेऊन बँक आता नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-लॉबी, टॅब बँकिंग असे कॅशलेस बँकिंगला प्राधान्य देणार असल्याने त्यासाठी हे मुख्यालयातच सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे.

जिव्हाळ्याची बँक..
कोल्हापुरातील ‘बहुजन समाजाची अत्यंत जिव्हाळ्याची बँक’ अशी ‘कोल्हापूर अर्बन’ बँकेची प्रतिमा आहे. ठेवीदारांचा पैसा जबाबदारीने वापरला पाहिजे, हे तत्त्व अंगीकारून बँकेची वाटचाल सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे, परंतु प्रत्यक्षातील त्याच्या उलट व्यवहार सुरू झाल्यानेच वाद सुरू झाला आहे. आतापर्यंत कोल्हापुरातील ‘मराठा’, ‘बलभीम’, ‘शाहू’ अशा बँकांचे अस्तित्व कायमचे पुसले गेले आहे. त्या वाटेने या बँकेने जाऊ नये, अशी भावना मोठ्या वर्गाची आहे.

Web Title: Debate in Kolhapur Urban Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.