कर्जमाफीची रक्कम शनिवारपासून खात्यावर : जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:14 PM2020-01-31T12:14:22+5:302020-01-31T12:21:25+5:30
जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार सहकार विभागाने ठरवलेल्या नियोजनानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतक-यांना कर्जमाफीची रक्कम खात्यावर मिळणार होती. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये याद्या अपलोड करून त्या प्रसिद्धीस दिल्यावर हरकती घेतल्या जाणार होत्या
कोल्हापूर: राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उद्या, शनिवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा करण्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घोषित केल्यानंतर एकच धावपळ उडाली आहे. सहकार विभागाने याद्या अपलोडिंगचे काम वेगाने हाती घेतले आहे. या कर्जमाफीत दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार असून यात जिल्ह्यातील ५७ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार सहकार विभागाने ठरवलेल्या नियोजनानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांना कर्जमाफीची रक्कम खात्यावर मिळणार होती. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये याद्या अपलोड करून त्या प्रसिद्धीस दिल्यावर हरकती घेतल्या जाणार होत्या. ही सर्व प्रक्रिया मार्चमध्ये पूर्ण होणार होती. तथापि गुरुवारी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी १ फेब्रुवारीपासून रक्कम खात्यावर जमा करण्याचे आदेश दिल्याने सहकार विभागात एकच धावपळ सुरू झाली. सर्व यंत्रणा कामाला लावून दिवसभर याद्या बनवण्याचे काम सुरू होते. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे हे मुंबईला गेले असल्याने विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सर्व काम हाती घेतले. १९०१ सेवा सोसायट्याकडील कर्जखात्यांची लेखापरीक्षकांकडून तपासणी गुरुवारी पूर्ण करण्यात आली.त्यासाठी ६९ लेखापरीक्षकांनी १ एप्रिल २0१५ ते सप्टेंबर २0१९ अखेर वाटप झालेल्या कर्जखात्यांचा अहवाल तयार करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली.
गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत अंतिम करून त्या वेबसाईटवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज, शुक्रवारी अपलोड झाल्यानंतर त्या कुणालाही पाहता येणार आहेत. मंत्र्यांच्या आदेशानुसार एक फेब्रुवारीला प्रातिनिधिक स्वरूपात रक्कम जमा करून उर्वरित खात्यांची पडताळणी व शहानिशा करूनच रक्कम थकीत कर्जदार शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे सहकार विभागाचे नियोजन दिसत आहे.
या योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्जपरतफेड करणारे व पुनर्गठित शेतकरी यांत धरलेले नाहीत. त्यांचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त उपसमिती घेणार आहे. याचाही निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याने त्याच्या याद्या बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात ५७ हजार शेतकरी दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्जदार आहेत. त्यांच्यासाठी ३०९ कोटी रुपयांची रक्कम अपेक्षित आहे. ५७ पैकी ३२ हजार हे एकट्या जिल्हा बँकेचे आहेत. त्यांना १७० कोटींचा लाभ होणार आहे.