पूरग्रस्त सामाईक क्षेत्र सभासदांची कर्ज माफी व्हावी: शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:24 PM2020-02-26T13:24:30+5:302020-02-26T13:26:08+5:30
कोल्हापूर : शासनाने लेखापरीक्षकांना पूरग्रस्त भागातील सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण कोणत्या प्रकारे करावे याबाबत सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम ...
कोल्हापूर : शासनाने लेखापरीक्षकांना पूरग्रस्त भागातील सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण कोणत्या प्रकारे करावे याबाबत सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरी क. म. पत्रकाप्रमाणे कर्जपुरवठा केलेल्या संस्थेचे लेखापरीक्षण करून कर्जमाफी त्वरीत मिळावी, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अमर शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. जुलै-आॅगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीने महापूर येऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पूरग्रस्त संस्थेने दिलेल्या कर्जास कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु ज्यांचा सामाईक क्षेत्राचा ८ अ स्वतंत्र आहे, अशा सभासदांचे कर्जमाफीचे लेखापरीक्षण करण्यात आलेले आहे.
शासनामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यामधील सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही. शासनाने लेखापरीक्षकांना सामाईक क्षेत्राचे लेखापरीक्षण कोणत्या प्रकारे करावे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तरी क. म. पत्रकाप्रमाणे कर्ज पुरवठा केलेल्या संस्थेचे लेखापरीक्षण करून कर्जमाफी त्वरीत मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
शिष्टमंडळात शहरप्रमुख शिवाजी जाधव, राजू यादव, विराज पाटील, अवधूत साळोखे, तानाजी आंग्रे, संजय स्वामी, अशोक जाधव, कृष्णात पाटील, आदींचा समावेश होता.