कर्जमाफी : सरकारकडून दिशाभूल
By admin | Published: April 24, 2017 01:12 AM2017-04-24T01:12:06+5:302017-04-24T01:12:06+5:30
सतेज पाटील : बहुमताच्या जोरावर भाजपची रेटारेटी; संघर्ष यात्रेसाठी उपस्थितीचे आवाहन
कोल्हापूर : वास्तविक राज्यातील शेतकऱ्यांची मागणी पाहता अधिवेशनातच कर्जमाफीचा निर्णय जाहीर होईल, असे आम्हाला वाटले होते; परंतु सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असून बहुमताच्या जोरावर भाजपने रेटारेटी सुरू केली असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. मंगळवारी जिल्ह्णात होणाऱ्या संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समितीमध्ये रविवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व अन्य पक्षांनी एकत्र काढलेल्या संघर्ष यात्रेचे मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्णात आगमन होणार आहे. सकाळी शाहू जन्मस्थळी अभिवादन, अंबाबाईला साकडे घालून यात्रा मुदाळ येथे जाणार आहे. तेथे आजरा, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, कागल, भुदरगड या सहा तालुक्यांची सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता येथील दसरा चौकात सभा होणार आहे. संध्याकाळी जयसिंगपूर येथे सभा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर सतेज पाटील म्हणाले, शेतकरी गेली १०० वर्षे कर्ज काढत आला आहे. मात्र, ऊठसूठ कोणी कर्जमाफी मागितली नाही; परंतु गेली तीन वर्षे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी आम्ही केली; परंतु यासाठी भांडणाऱ्या आमच्या १९ आमदारांना निलंबित केल्यानंतर आम्हाला शेवटी जनतेच्या न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कर्जमाफी करायची नसल्याने भाजपकडून आता लोकांची दिशाभूल सुरू होईल. नको ते विषय पुढे आणले जातील. गोबेल्स नीतीने वेगळे वातावरण निर्माण केले जाईल. त्यामुळे आता या सगळ्याला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा.
करवीर तालुकाध्यक्ष शंकर पाटील यांनी स्वागत गेले. प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी यांनी प्रास्ताविकामध्ये राजयातील या संघर्ष यात्रेचा आढावा घेतला. यावेळी शशांक बावचकर, बजरंग पाटील, संजय पाटील यांची भाषणे झाली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, इचलकरंजीचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे, शिरोळ तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, शशिकांत खोत, सचिन चव्हाण, विद्याधर गुरबे, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.