डेक्कन चौकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Published: December 31, 2015 11:38 PM2015-12-31T23:38:17+5:302016-01-01T00:09:32+5:30

इचलकरंजीत अतिक्रमण हटाव मोहीम : मद्याच्या बाटल्यांचा ढिगारा

Deccan Chowk takes bold breathing | डेक्कन चौकाने घेतला मोकळा श्वास

डेक्कन चौकाने घेतला मोकळा श्वास

Next

इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवर डेक्कन मिल परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत चायनीज गाडे, चहाच्या, पानाच्या टपऱ्या, कपड्यांचे स्टॉल, किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे सतत गजबजलेल्या या स्टेशन रोडने गुरुवारी मोकळा श्वास घेतला. दरम्यान, चायनीज, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यांच्या बाटल्या सापडल्याने शहरात ओपन बार खुलेआम सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी
डॉ. प्रशांत रसाळ व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत येथील मुख्य रस्त्यावरील कायमस्वरूपी अतिक्रमणे हटविण्याबरोबरच फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू आहे. येथील स्टेशन रोडवर अतिक्रमणांचा अतिरेक झाला होता. आधीच अरुंद रस्ता आणि त्यात अतिक्रमणे, यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणे हटविली जात नव्हती. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना येता-जाता जीव मुठीत धरूनच जावे लागत असे. या भागातील फुटपाथही विविध प्रकारच्या स्टॉल्स्नी व्यापला होता.
अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने डेक्कन मिल चौकापासून गुरुवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे आणि कायमस्वरूपी ठाण मांडलेली दुकाने, स्टॉल्स् काढून ते जप्त करण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी याठिकाणी चायनीज गाड्यांच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षित भिंतीच्या पिछाडीस मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या मद्यांच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला. अतिक्रमण हटाव मोहिमेत आतापर्यंत बहुतांश ठिकाणी खुलेआम ओपन बार सुरू असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रत्येक ठिकाणी मद्यांच्या बाटल्यांचा खच सापडला आहे. त्यामुळे या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अशा ठिकाणी कारवाई करून या ओपन बारला पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)


पुन्हा अतिक्रमण केल्यास फौजदारी : प्रज्ञा पोतदार
अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार म्हणाल्या, शहरात पुन्हा अतिक्रमणाचा विळखा वाढू नये, म्हणून दर महिन्याला कोणतेही आठ दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात जर पुन्हा अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही पोतदार यांनी यावेळी दिला.

Web Title: Deccan Chowk takes bold breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.