मटका व्यावसायिकांचे लाड पोलिसांच्याच अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:45 AM2019-04-10T00:45:41+5:302019-04-10T00:45:46+5:30
एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात फोफावलेल्या मटका-जुगाराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पाठराखण केली जात आहे. याच ...
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात फोफावलेल्या मटका-जुगाराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पाठराखण केली जात आहे. याच जोरावर बुकीचालकांनी बस्तान बसविले आहे. याचाच परीणाम यादवनगर येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हात उगारण्याचे धाडस कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले.
बुकीचालक सलीम मुल्ला हा मटकाकिंग ‘सम्राट’चा हस्तक असतानाही त्याच्या कॉलरला हात घालण्याचे धाडस पोलीस का करीत नाहीत? अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा हा मटका-जुगार हद्दपार होणार कधी, असा प्रश्न जनतेला पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मटका व जुगारातील उलाढाल कोटींच्या वर होते. या दोन नंबरच्या उलाढालीला पोलिसांना आजपर्यंत एकदाही ब्रेक लावता आलेला नाही. ज्या-त्या हद्दीतील वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून या मटका व्यावसायिकांची पाठराखण होत असल्याने विशिष्ट बुकी मालकांवर कारवाई करण्याचे धाडस झालेले नाही. ‘सम्राट’च्या आश्रयाखाली बुकीमालकांनी गावा-गावांत मटक्याचे एजंट पेरले असून दिवसाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मटका खेळणाºया व्यक्तीची कुटुंबे रस्त्यावर आली आहेत; तर कर्जबाजारी होऊन काहींनी स्वत:चे जीवन संपवून घेतले आहे. अशी भयाण परिस्थिती जिल्ह्यात आहे.
तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी कीड उखडून टाकण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची आहे. ते याबाबतीत शांत का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. नियमांना फाटा देत अवैध व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘एंट्री’ हाच पर्याय राहतो. त्यामुळे ‘एंट्री’ दिली की सर्व काही माफ..! असा गुप्त कारभार सध्या पोलीस दलात सुरू आहे. या कारभारामुळेच पोलिसांवर हात उचलण्याचे धाडस मटका बुकी सलीम मुल्ला व त्याच्या साथीदारांनी केले.
दहा रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत मटका खेळणारे तरुण व सेवानिवृत्त लोक टपरीवर उभे असलेले चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात ३२ पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहा ते बारा बुकी असल्याचे चित्र आहे. ज्या गोष्टी सामान्य माणसांच्या नजरेस येतात, त्या पोलिसांच्या नजरेला येत नसतील का? जिल्ह्यात राजरोस मटका सुरू असताना कारवाई टाळली जाते याचे कारण या व्यवसायातून दरमहा आपसूक येणारा मलिदा हेच आहे.
सगळ्यांचा म्होरक्या ‘सम्राट’
जिल्ह्यात मटका-जुगार अशा अवैध व्यवसायांत गुंतलेल्या विजय लहू पाटील, सलीम मुल्ला, संजय रामचंद्र देसाई, बशीर अब्बास पटेकर, संजय विलास मेढे, राहुल जोतिराम पाटील, अनंतकुमार जयपाल चौगुले, दत्ता नरसू कोळी, बाळू बाबू कोरवी, यशवंत ऊर्फ नाना सुर्वे, अशोक बळवंत चौगुले, सचिन जनार्दन मोळे, भास्कर शिवाजी भांदिगरे, चॉँद बाळासाहेब सर्जेखान, मधुकर केशव जमादार, शरद कोराणे, अभिजित यादव यांच्यासह ८७ बुकीचालकांचा म्होरक्या मध्यवस्तीत राहणारा ‘सम्राट’ आहे, हे पोलिसांना माहीत असूनही त्याचा बंदोबस्त करण्याचे धाडस ते करीत नाहीत. हा ‘सम्राट’ मध्यरात्री दोनच्या सुमारास शहरातून मोपेडवरून फिरत डिकी भरून मटक्याचा पैसा गोळा करीत असतो.