मृतांच्या नातेवाइकांची फसवणूक,सांगलीच्या ठकसेनास अटक : बनावट शासकीय पत्रे पाठवून कर्ज, नोकरीचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:29 AM2018-08-22T01:29:52+5:302018-08-22T01:31:25+5:30
मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना बनावट शासकीय पत्र पाठवून व अधिकारी असल्याचे सांगत लोकांची कर्ज व नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठकसेनास येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. प्रकाश कल्लेशा पाटील
इचलकरंजी : मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना बनावट शासकीय पत्र पाठवून व अधिकारी असल्याचे सांगत लोकांची कर्ज व नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठकसेनास येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. प्रकाश कल्लेशा पाटील (वय ३४, रा. वसंतनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सध्या आठ गुन्हे दाखल असून, त्यातील अठरा तोळे सोन्याचे दागिने, आठ मोबाईल, एक कार, शासकीय बनावट शिक्के, अंबर दिवा असा पंधरा लाख ८६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या स्वरूपाचे आणखीन काही गुन्हे त्याच्याकडून घडले असून, तक्रारदारांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी केले.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रकाश पाटील हा अपघातात मृत झालेल्या तरुणांचे नाव व पत्ता वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतून घेऊन त्या पत्त्यावर महाराष्ट शासन, भारत सरकार असा शासकीय शिक्का मारून त्यामध्ये आपण मृत व्यक्तीचा मित्र असल्याचे भासविणारा मजकूर लिहून तसेच आपण त्याचा मित्र असल्याचे व शासकीय अधिकारी म्हणून मोठ्या पदावर नियुक्त असल्याचे लिहून पत्रामध्ये दुसºयाच्या नावे घेतलेल्या बनावट सीमकार्डचा नंबर नमूद करून ते पत्र पाठवायचा. त्यामुळे पत्र मिळाल्यानंतर मृत तरुणाचे नातेवाइक त्याला पत्रातील मोबाईल नंबरवर संपर्क करायचे. त्या संभाषणातून तो त्यांना कौटुंबिक व अन्य माहिती विचारून त्या पत्त्यावर भेटायला जायचा. जाताना भाड्याने घेतलेली कार, त्यावर लाल अंबर दिवा व महाराष्टÑ शासन अशी पाटी लावून जायचा. त्यामुळे संबंधित मृत तरुणाच्या कुटुंबीयांना तो शासकीय अधिकारी असल्याची खात्री पटायची.
त्यानंतर तो त्या कुटुंबीयांना त्यांच्या अडचणी विचारून त्यानुसार मदत करण्याची भावना व्यक्त करत मोठ्या रकमेचा बनावट धनादेश द्यायचा. त्या धनादेशाच्या आधारे घरातील रक्कम किंवा सोने असा मौल्यवान मुद्देमाल घ्यायचा आणि निघून जायचा, अशा स्वरूपाचे त्याने कोल्हापूर जिल्ह्यात चार, सांगली जिल्ह्यात तीन, सातारा जिल्ह्यांत एक असे आठ गुन्हे केले आहेत. त्याबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर त्याने कागल, हुपरी व सोलापूर जिल्ह्यांतील काही गावांमध्ये अशी गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. त्याबाबत अद्याप नोंद झालेली नाही.
दरम्यान, हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेर्ले गावामधील एका महिलेला त्यांचा अपघातात ठार झालेल्या तरुण मुलाचा मित्र असल्याचे पत्र पाठवून त्याने अशाच प्रकारे फसविले होते. त्यावेळी महिलेला संशय वाटल्याने त्यांनी दागिने देण्यास नकारही दिला होता. मात्र, प्रकाशने जबरदस्तीने त्यांच्याकडील दागिने हिसकावून घेऊन पलायन केले होते. त्यावेळी त्या महिलेने प्रकाश पाटील याने घेऊन आलेल्या कारचा नंबर नोंद केला होता. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्या नंबरवरून पथकाने बारकाईने तपास करत या प्रकरणाचा उलगडा केला.
विविध कलमांखाली गुन्हे दाखल
प्रकाश पाटील याच्यावर ३९२, ४२०, १७०, ४६५, ४६८, ४७१, ३४, आदी कलमांनुसार रॉबरी, फसवणूक, शासकीय अधिकारी असल्याचा बनाव असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यात चार, सांगली जिल्ह्यात तीन, सातारा जिल्ह्यात एक असे आठ गुन्हे दाखल आहेत, तर सोलापूर जिल्ह्यातही काही गुन्हे दाखल होणार आहेत.
आरोपीची पार्श्वभूमी
संशयित प्रकाश पाटील याला पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यामध्ये आई-वडील आजारी आहेत. मुलगा गतिमंद आहे, तर भाऊ व त्याची पत्नी विभक्त राहतात, अशी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे.
मिळविलेला पैसा चैनीत उडविला
प्रकाश पाटील याने अशी कृत्ये करून फसवणूक करत यातून मिळविलेला पैसा चैनी करून उडविला आहे तर यातून मिळविलेले दागिने, भांडी व अन्य मुद्देमाल स्वत:कडेच ठेवून घेतला होता. गरज लागेल तेव्हा त्यातील वस्तू विकत होता.
विविध खात्यांचा अधिकारी असल्याचा बनाव
संशयित प्रकाश पाटील हा अशी फसवणुकीची कृत्ये करताना वेगवेगळी पदे सांगत होता. त्यामध्ये आरटीओ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांचा स्वीय सहायक, शासकीय मुख्य अधिकारी अशी पदे सांगून फसवणूक करत होता.
संशयित आरोपी सुशिक्षित
प्रकाश पाटील याने समाजशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्याच्या सन २०१४ सालापर्यंतच्या कृत्यांचा उलगडा झाला असून, त्यापूर्वीही त्याने काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.
सैन्यदलातील मृताच्या नातेवाइकांचीही फसवणूक
बिऊर (जि. सांगली) येथील चंद्रभागा बबन पाटील यांचा मुलगा सुधीर पाटील हा सैन्यदलात होता. तो मृत झाल्याचे समजताच त्यांना गाठून तुमच्या मुलाची शेवटची इच्छा घर बांधण्याची होती. त्यासाठी मी तुम्हाला मदत करतो, असे सांगून संशयित प्रकाश पाटील याने त्यांची सहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
चारशे मृत नातेवाइकांना पत्रे; ५ ते २५ हजारांची फसवणूक
संशयित प्रकाश पाटील याने सुमारे ४०० मृत व्यक्तींच्या नावाने शासकीय शिक्का असलेली बनावट पत्रे पाठविली आहेत. त्यातील २० ते २५ कुटुंबीयांना पाच हजारांपासून ते २५ हजारांपर्यंतची फसवणूक केली आहे. मात्र, रक्कम किरकोळ व कुटुंब दु:खात असल्याने त्याबाबत नोंद झालेली नाही.