डिसेंबर-जानेवारीची पाणी बिले मे महिन्यात
By admin | Published: May 24, 2016 11:26 PM2016-05-24T23:26:10+5:302016-05-25T00:28:02+5:30
ग्राहकांतून संतापाची लाट : एका ‘स्पॉट बिला’ला १८ मिनिटांचा कालावधी
तानाजी पोवार -- कोल्हापूर -‘स्पॉट बिलिंग’ची अत्याधुनिक योजना असल्याने पाणी रिडिंग पाहून जागीच ग्राहकांच्या हाती बिले दिली जात असली, तरी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत ‘ई’ वॉर्डातील पाणी वापराची बिले मे महिन्याच्या अखेरीस ग्राहकांच्या हाती पडू लागल्याने ग्राहकांतून संतापाची लाट पसरत आहे. संपूर्ण शहरात सुमारे एक लाख नळ कनेक्शनधारक असले, तरी त्यापैकी सुमारे ६० हजार कनेक्शनधारक ग्राहक हे एका ‘ई’ वॉर्डात आहेत. मीटर रीडर जाग्यावर येत नाही, रिडिंग न घेताच बिले वाढून येतात, आदी विविध तक्रारी वाढू लागल्याने महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा विभागाचा बिलिंग विभाग अत्याधुनिक करण्याचे ठरविले. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या कालावधीत ही ‘स्पॉट बिलिंग’ची योजना पुढे आली; पण तांत्रिक बाबींचा विचार करता ही योजना कार्यान्वित केली नव्हती; पण बिदरी यांच्या बदलीनंतर पुन्हा ही ‘स्पॉट बिलिंग’ची योजना सुरू केली.
ग्राहकाच्या दारी जाऊन तेथे ‘स्पॉट बिलिंग’ योजना राबविताना येणाऱ्या अडचणींचा प्रशासनाने कधीही विचार केला नाही. विशेष म्हणजे, ग्राहकाचे पाणी मीटर हे अडगळीत असते, ते मीटर शोधून त्याचे रिडिंग तपासून ते आॅनलाईनद्वारे बिलिंग प्रिंटरवर काढून देताना सर्व्हर कनेक्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर इंटरनेटला अडथळा आला अगर त्या भागात रेंज नसल्यास सर्व्हर कनेक्ट होण्यास लागणारा विलंब हा मीटर रीडरला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांना पाण्याची बिले उशिरा मिळत आहेत.
शहरात एक लाख पाण्याची कनेक्शन आहेत, तरीही त्यापैकी फक्त ‘ई’ वॉर्डात सुमारे ६० हजार कनेक्शन आहेत. ही ‘ई’ वॉर्डातील डिसेंबर-जानेवारी महिन्यांतील ‘स्पॉट बिले’ मे महिन्यात देण्याची कार्यवाही सुरूआहे. यापैकी केवळ ५० टक्के बिले दिली आहेत. याशिवाय ए, बी, सी, डी या चार वॉर्डातील सुमारे ४० हजार कनेक्शनपैकी सर्व ‘स्पॉट बिले’ दिली आहेत. सध्या त्यांना फेब्रुवारी-मार्च महिन्यांतील पाणी बिले देण्याची कार्यवाही सुरू आहे. (क्रमश:)
स्वत: आयुक्तांनी काढली ‘स्पॉट बिले’
‘स्पॉट बिलिंग’ची योजना मार्च महिन्यात सुरु झाल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वत: गेल्या महिन्यात ‘ई’ वॉर्डात ‘स्पॉट बिलिंग’ केले. त्यावेळी सुमारे तासाभरात फक्त चार ते पाचच ‘स्पॉट बिले’ तयार झाली. ही बिले करताना सर्व्हर कनेक्ट होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शोधा म्हणजे सापडेल
पाणी ग्राहकांच्या हाती मिळालेल्या बिलामध्ये फक्त ग्राहकाचे नाव व जोडणी नंबर आहे. ग्राहकाचा पत्ता नाही. मागील रिडिंग घेतल्याची तारीख, कनेक्शनची साईज नाही. त्यामुळे हे पाण्याचे बील कोणत्या भागातील आहे, हे समजत नाही. पूर्वीच्या पाणी बिलावर नियमावली, पाणी वापराच्या बिलाचे दर, आदी नमूद होते; पण आता ही नियमावली व दरपत्रकच गायब झाले आहे.
पाण्याचे एक स्पॉट बिल परिपूर्ण करून देण्यासाठी मीटर रीडरला किमान १६ ते १८ मिनिटांचा कालावधी लागत आहे. यापूर्वी जुन्या पद्धतीनुसार एका मीटर रीडरकडे दरमहा सुमारे चार हजार कनेक्शन होती. त्यावेळी प्रतिदिन १०० ते १२५ बिले दिली जात होती. ती आता प्रत्येकाकडे अवघी २५०० इतकी आली आहेत; पण कनेक्शन कमी देण्यात आली असली तरीही त्यांना मदतनीस नसल्याने एका मीटर रीडरकडून प्रतिदिन अवघी ३० ते ३५ ‘स्पॉट बिले’च तयार होऊ लागल्यामुळे त्याचा परिणाम पाणी बिलांवर होत आहे.