किचन ट्रॉली बनवून देण्याचे आमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 08:53 PM2020-01-10T20:53:30+5:302020-01-10T20:55:38+5:30
घरामध्ये किचन ट्रॉली बसवून देण्याची सोशल मीडियावर आॅनलाईन जाहिरात करून भामट्याने कोल्हापुरातील डॉक्टर, वकिलांसह शासकीय अधिकाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित भामटा सुनील मारुती कुंभार (रा. साळोखे पार्क) याच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची चाहूल लागताच तो पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कोल्हापूर : घरामध्ये किचन ट्रॉली बसवून देण्याची सोशल मीडियावर आॅनलाईन जाहिरात करून भामट्याने कोल्हापुरातील डॉक्टर, वकिलांसह शासकीय अधिकाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित भामटा सुनील मारुती कुंभार (रा. साळोखे पार्क) याच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची चाहूल लागताच तो पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी सांगितले, संशयित सुनील कुंभार याने सोशल मीडियावर महालक्ष्मी फर्निचर आणि इंटेअिरतर्फे स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, फरशी फिटिंग, प्लंबिंग, वायरिंग व रिन्युएशन करून मिळेल, अशी जाहिरात केली आहे. त्याचे कार्यालय राजेंद्रनगर येथे असल्याचा पत्ता त्याने दिला आहे. त्यावरील नंबरवरून गरजू लोक संपर्क साधत होते.
डॉ. दीप्ती सर्वेश कुलकर्णी (रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) यांनी त्याच्याशी संपर्क साधून त्याला आॅर्डर दिली. तो घरी येऊन किचनची मापे घेऊन गेला. त्यानंतर १८ हजार रुपये खर्च सांगून डॉ. कुलकर्णी यांच्याकडून १५ हजार रुपयांचा धनादेश घेऊन गेला.
तो बँकेतून त्याने वटवून पैसे काढून घेतले. त्यानंतर त्यांनी वारंवार त्याला किचन ट्रॉली बसविण्यास सांगितले असता तो टाळाटाळ करू लागला. त्याला एक-दोन वेळा शाहूपुरी पोलीस ठाण्यात बोलावून लेखी लिहून घेत समजही दिली; परंतु त्याने किचन ट्रॉली बसवून दिली नाही. संशयित कुंभार याने डॉक्टर, वकिलांसह शासकीय कर्मचाऱ्यांना सुमारे लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
तक्रारदारांना धमकी
संशयित कुुंभार याच्याकडे लोक किचन ट्रॉली बसवून न दिल्याने पैसे परत करण्याची मागणी करीत होते. त्यांना तो पैसे मागितले किंवा पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार देण्याचे धाडस कोणी करीत नव्हते.
संशयित सुनील कुंभार याने कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे. त्याच्या धमकीला कोणी घाबरू नये.
श्रीकृष्ण कटकधोंड,
पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे.