हद्दवाढीनेच विकास ही भ्रामक कल्पना : नरके
By admin | Published: June 16, 2015 01:09 AM2015-06-16T01:09:29+5:302015-06-16T01:14:41+5:30
मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी भेटणार : कळंब्यातील मेळाव्यात निर्णय; हद्दवाढीला तीव्र विरोध
कळंबा : शहर व उपनगरांतील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्यात महापालिका प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे, तर या हद्दवाढीत प्रस्तावित २० गावांना सुविधा कशा पुरविणार?, असा सवाल उपस्थित करत, हद्दवाढीनेच शहर व परिसराचा विकास होईल ही भ्रामक कल्पना असल्याचा टोला आमदार चंद्रदीप नरके यांनी हद्दवाढविरोधी कृती समितीच्या कळंबा येथे सोमवारी झालेल्या मेळाव्यात लगावला. शुक्रवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भेटून हद्दवाढीविरोधी निवेदन देण्याचे यावेळी सर्वानुमते ठरले. मेळाव्यास कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नरके म्हणाले, हद्दवाढीचे जमिनीचे भाव वाढणार, शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या शेतीवरच हद्दवाढीने गंडांतर येणार आहे. ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी हद्दवाढ फेटाळणे गरजेचे आहे. कोल्हापूर शहरापेक्षा गावे निश्चितच स्वायत्त व विकसित आहेत. ग्रामीण भागाचा विकास करण्यास आम्ही समर्थ आहोत, ग्रामीण भागाचा विकास म्हणजे हद्दवाढ, असे फसवे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.
आमदार अमल महाडिक म्हणाले, प्रस्तावित गावांची लोकसंख्या मोठी आहे. स्वतंत्र नगरपरिषद होण्याइतपत ही गावे मोठी व स्वावलंबी आहेत. एमआयडीसीच्या शहरातील समावेशाने उद्योगधंदे स्थलांतरित होण्याची भीती आहे, तर करवाढीचा फटका ग्रामीण नागरिकांना बसणार आहे. कोणतीही भौगोलिक संलग्नता नसताना ही गावे हद्दवाढीत घेण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.
केंद्र सरकार ग्रामपंचायतींना विविध योजनांतून निधी देते, त्यातून गावे विकसित व हागणदारी मुक्त झाली आहेत. मात्र, मनपाला सांडपाण्याचे नियोजन करता आलेले नाही, असा खोचक प्रश्न आमदार डॉ. मिणचेकर यांनी उपस्थित केला. यावेळी पंचायत समिती सदस्य अरुणिमा माने, जयसिंग काशीद, विलास पाटील, महेश चव्हाण, सरदार मिसाळ आदींसह प्रस्तावित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाथाजी पोवार, एस. आर. पाटील, प्रताप साळोखे, बाजीराव पाटील यांचीही भाषणे झाली. (वार्ताहर)