गावच्या जत्रा - यात्रांबाबत निर्णय घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:46+5:302021-02-07T04:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या गावोगावच्या जत्रा - यात्रांबाबत योग्य ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या गावोगावच्या जत्रा - यात्रांबाबत योग्य ते धोरण ठरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आली. या सभेत अपंगांचे साहित्य वाटपाला विलंब केल्याने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. शाळेतील रिक्त पदे भरा, विस्कळीत होत असलेल्या संगणक सेवेचा सर्विस चार्ज भरू नका, आदी विषयांवरही या सभेत जोरदार चर्चा झाली. प्रभारी सभापती सुनील पोवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी गटविकास अधिकारी जयंत उगले उपस्थित होते. गेल्या वर्षभरापासून गावच्या जत्रा-यात्रा बंद झाल्या आहेत. मात्र, सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, लस उपलब्ध झाल्याने या जत्रा-यात्रा भरविण्यासाठी ग्रामस्थांना परवानगी कधी देणार, असा प्रश्न इंद्रजीत पाटील यांनी विचारला. यावर सभापती सुनील पोवार यांनी जिल्हा प्रशासनाशी तसा पत्रव्यवहार करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. चंद्रकांत पाटील, मोहन पाटील, सागर पाटील, प्रदीप झांबरे यांनीही या विषयावर मत मांडले. तालुक्यात अपंगांसाठी देण्यात येणाऱ्या सायकल अद्याप का दिल्या नाहीत, असे विचारत प्रदीप झांबरे यांनी सायकलसाठी चकरा मारणाऱ्या एका अपंग व्यक्तीला सभागृहात उपस्थित केले. विजय भोसले यांनी संबंधित अपंगाला तुम्ही कोणा -कोणाला कितीवेळा भेटलात आणि त्यांनी काय उत्तरे दिली, याचा तपशील सभागृहात सांगा, अशी मागणी केली. संबंधित व्यक्तीला सभागृहात हजर केल्याने अविनाश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून सायकल देण्यास विलंब का झाला, त्याचा खुलासा करावा, अशी मागणी राजू सूर्यवंशी यांनी केली. या प्रश्नावरून सभापती पोवार आणि सहाय्यक गटविकास अधिकारी शरद भोसले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या विभागाचे प्रमुख असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांवर याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी इंद्रजीत पाटील यांनी केली. तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक खराब झाले आहेत तसेच संगणक सेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या सेवेचा सर्विस चार्ज कोणीही भरू नये, असा ठराव सागर पाटील यांनी मांडला. त्याला सभागृहाने लगेच मंजुरी दिली.
चौकट
पगार वेळेवर आहेत, पण काम समाधानकारक नाही
शिक्षकांचे पगार वेळेवर होत आहेत, परंतु त्यांचे काम समाधानकारक नाही. ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाल्याचा आरोप रमेश चौगले यांनी केला. तालुक्यातील १२५ रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी व अश्विनी धोत्रे यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत शाळांचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी अश्विनी धोत्रे व विजय भोसले यांनी यावेळी केली.
या सभेत यशोदा पाटील, सरिता कटेजा, अर्चना खाडे, सविता पाटील, शोभा राजमाने, सुनीता कांबळे, सुरेखा सातपुते, नेताजी पाटील, मोहन पाटील, रमेश चौगले आदींनी विविध विषयांवरील चर्चेत भाग घेतला.