निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
By admin | Published: January 22, 2016 01:01 AM2016-01-22T01:01:12+5:302016-01-22T01:04:00+5:30
‘स्वीकृत’ नगरसेवकांचे त्रांगडे : नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागविणार
कोल्हापूर : महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. नगरविकास विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने ते काय सूचना देतात, त्यावर या सदस्यांचे भवितव्य ठरणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार
आहे.
बुधवारी (दि. २०) झालेल्या महापालिका सभेत सत्तारूढ दोन्ही काँग्रेसने माजी महापौर सुनील कदम यांना स्वीकृत म्हणून सभागृहात येण्यापासून पद्धतशीरपणे रोखले. त्यामुळे कदम यांचे पुढे काय होणार अशी विचारणा सर्वत्र होत होती. कदम यांना हे पद मिळाले नाही हे खरे असले तरी त्यांच्यामुळे इतर चौघांचे पदही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे; कारण या पदाबाबत महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागविला. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असल्याने ते काय निर्णय देतात, याला महत्त्व आहे.
सत्तारूढ दोन्ही काँग्रेसने फक्त माजी आमदार महादेवराव महाडिक समर्थक असलेल्या सुनील कदम यांनाच विरोध केला. सत्तारूढ गट भाजपच्या किरण नकाते यांच्या निवडीवेळी तटस्थ राहिला. त्यामुळे दोन्ही काँग्रेस भाजपच्या आड आलेली नाही. त्यांना कदम यांनाच विरोध होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी नव्या व्यक्तीचे नाव देऊन हे पद भरून घेतले जाण्याचीही शक्यता आहे. तसे करून वादावर पडदा टाकणार की इतरांच्या नियुक्तीलाही लगाम लावणार, हीच खरी उत्सुकता आहे.
कदम यांचा पत्ता कट व्हावा ही खेळी कुणाची असेल अशा चर्चेला गुरुवारी महापालिका चौकात चांगलाच रंग भरला होता. भाजप-ताराराणी आघाडी अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून काहींनी जवळच्या ‘अजिंक्यतारा’वर फॉर्म्युला पोहोच केल्याची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
अभिप्रायानंतरच स्वीकृत नगरसेवकांना नियुक्तीपत्रे
‘स्वीकृत नगरसेवक’पदासाठी आयुक्तांनी महासभेकडे शिफारस केली, की त्यास महासभेने मान्यता द्यायची असते; परंतु दोन्ही बाजूने जोरदार हरकती घेण्यात आल्यामुळे पाच स्वीकृत नगरसेवकपदासाठी बुधवारी मतदान घेण्यात आले होते. महाराष्ट्र मनपा कायद्यात मतदान घेण्याची तरतूद नमूद नाही. त्यामुळे महासभेच्या मान्यतेने मतदान घेण्याचा पहिलाच प्रकार घडला आहे म्हणून या निवडी ‘वैध की अवैध’ याबाबत नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागविला जाणार आहे. त्यांच्याकडून अभिप्राय आल्यानंतर संबंधित नगरसेवकांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. बुधवारी ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून निवड झालेल्या तौफिक मुल्लाणी, मोहन सालपे, प्रा. जयंत पाटील, किरण नकाते यांना आयुक्तांनी अद्याप नियुक्तीपत्रे दिलेली नाहीत.
अब्रूनुकसानीचा दावा करणार : सुनील कदम
सभागृहात देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. आपण गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल झाला आहे का याची चौकशी केली; परंतु आपल्या नावावर गुन्हा दाखल झालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. मला पोलिसांनी अशा कोणत्याही गुन्ह्यात अटक केलेली नाही तसेच साधे समन्सही काढलेले नाही. त्यामुळे प्रतिज्ञापत्रात तशी नोंद करण्याचे काहीच कारण नाही. चुकीची माहिती दिल्यामुळे माझी बदनामी झाली असून संबंधितांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे कदम यांनी सांगितले.