दर्शनरांगांतही ‘सीसीटीव्ही’-- अंबाबाई मंदिरबाबत ‘देवस्थान’चा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:46 AM2017-09-15T00:46:13+5:302017-09-15T00:47:32+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनरांगांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनरांगांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे. रांगेतील भाविकांना त्रास होऊ नये यासाठी वातानुकूलित यंत्रणा, पाण्याची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय सुवर्णपालखीच्या सुरक्षेसाठी दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत.
अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला आता सहा दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरू असून, गुरुवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुदेश देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दराडे उपस्थित होते. याप्रसंगी महाद्वारामधील चिंचा-आवळेवाल्यांसह सर्व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण दोन दिवसांच्या आत काढून घेण्याच्या सूचना दिल्या.
अंबाबाईच्या मुख्य दर्शनाची रांग सरलष्कर भवन येथून पुढे जाते. या दर्शनरांगेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे भर उन्हातही भाविकांना गारवा अनुभवता येणार आहे.याशिवाय मंदिराच्या चारीही दरवाजांतून भाविकांची होणारी ये-जा, एखाद्या दगडाची सुटलेली अडक किंवा धोकादायक परिसराबाबतही तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना दिली.
दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात
गरुड मंडपातून मुखदर्शनाची रांग जाते, येथेच भाविकांचे अभिषेक असतात; शिवाय सुवर्णपालखीदेखील आहे. त्यामुळे येथे सुवर्णपालखीच्या सुरक्षेसाठी दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात असतील. शिवाय बॅरिकेटिंग लावण्यात येणार आहेत. परिसरातील फरशी तापू नये यासाठी त्यावर एखादे रसायन टाकता येईल का, याचाही विचार केला जात आहे.