रिक्षातून विद्यार्थी वाहतूक : प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय,पालकांची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:16 AM2019-12-16T11:16:28+5:302019-12-16T11:28:31+5:30
रिक्षामामा आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक आमच्या सोईची आहे. ती बंद झाली तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. आॅटोरिक्षा विद्यार्थी वाहतूकप्रश्नी रविवारी जिल्हा काँग्रेस भवन येथे रिक्षाचालक व पालकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यात पालकांकडून हा सूर उमटला. अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या.
कोल्हापूर : रिक्षामामा आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक आमच्या सोईची आहे. ती बंद झाली तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. आॅटोरिक्षा विद्यार्थी वाहतूकप्रश्नी रविवारी जिल्हा काँग्रेस भवन येथे रिक्षाचालक व पालकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यात पालकांकडून हा सूर उमटला. अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या.
मेळाव्यात आॅटो रिक्षा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हणाले, १२ वर्षांखालील किमान १० मुलांना रिक्षातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी. तसेच पालकांनाही दोन पाल्यांना दुचाकीवरून सोडण्यास मुभा द्यावी, अशी आव्हान याचिका मंगळवारी (दि. १७) उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत दाखल केली जाईल. जर न्यायालयाने कायदा करून थांबण्यास सांगितले तर आम्ही रिक्षाचालक थांबू, असेही या मेळाव्यात स्पष्ट केले.
त्यावर सर्व शाळांतील सर्व पालकांनी तुम्ही आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहात. तुमचा व्यवसाय व आमची सोय तुम्ही बघता; त्यामुळे कायदा झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू . यासोबतच आर्थिक मदतही करू, अशी ग्वाही दिली. यात पालकांनी वर्षाकाठी १३ ते २० हजार इतका खर्च बसला होणार आहे. त्याच्या निम्म्याहून अधिक खर्चात आम्हाला ही सेवा रिक्षाचालक विनातक्रार दरवर्षी देतात. त्यामुळे याचाही सहानभूतिपूर्वक विचार होणे गरजेचे आहे, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.
महापौर लाटकर म्हणाल्या, शैक्षणिक वर्ष संपण्यास तीन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे अशा प्रकारे निर्णय झाल्यास पालकांना व त्यावर निर्भर असणाऱ्या रिक्षाचालकांनाही ते परवडणारे नाही. प्रसंगी आंदोलन झाल्यास त्यात आम्हीही शहराच्या प्रथम नागरिक म्हणून सहभागी होऊ.
यावेळी नगरसेवक अशोक जाधव, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, रिक्षाचालक संघटनेचे शशिकांत ढवण, अण्णा जाधव, प्रताप शिंदे, हणमंत पोवार यांच्यासह शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण उपसंचालकांची पुन्हा भेट
विद्यार्थी व पालकांची गैरसोय झाली आहे. सहा दिवसांपूर्वी याबाबतचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे उपसंचालकांना दिले होते. त्यात शिक्षण विभागाने काय कार्यवाही केली, याची माहिती घेण्यासाठी आज, सोमवारी पालक कृती समिती शिक्षण उपसंचालकांची भेट घेणार आहे.
एक महिन्याचे मानधन जाहीर
मेळाव्यासाठी मुद्दाम उपस्थित राहिलेले, पेशाने शिक्षक असलेले नगरसेवक अशोक जाधव यांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या न्याय्य लढ्यासाठी व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता स्वत:चे महिन्याचे मानधन जाहीर केले.