आजऱ्यातील दुकानगाळ्यांची १४०० ते ४००० भाडेवाढ करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:27+5:302021-09-24T04:28:27+5:30
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या. मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी स्वागत केले. आजरा नगरपंचायतीकडील दुकानगाळ्यांची यापूर्वी २०१४-१५ मध्ये भाडेवाढ ...
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या. मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी स्वागत केले. आजरा नगरपंचायतीकडील दुकानगाळ्यांची यापूर्वी २०१४-१५ मध्ये भाडेवाढ केली होती. आता गाळे भाडेवाढ केली पाहिजे अशी मागणी अशोक चराटी, संभाजी पाटील, किरण कांबळे, आनंदा कुंभार यासह सर्व नगरसेवकांनी केली. दुकानगाळे भाडेवाढ चांगली व्हावी, यामुळे नगरपंचायतीचा स्वनिधी वाढून शासनाचे अनुदान वाढ मिळण्यास मदत होते, असे अभिषेक शिंपी यांनी सांगितले. चर्चेअंती सर्व ठिकाणच्या दुकानगाळे भाडेवाढीसाठी किमान चौदाशे व जास्तीत जास्त चार हजार रुपयांची भाडेवाढ करण्यात आली.
आजरा शहरात बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. यापुढे आजरा शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी पोलीस प्रशासन मदत करेल व नगरपंचायत प्रशासनाच्या मदतीने बेसिस वाहनधारकांवर ही कारवाई केली जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी सांगितले. वाहनांची पार्किंगची व्यवस्था भाजी मंडई, जे. पी. नाईक हॉल समोर, रवळनाथ मंदिर परिसर, उर्दू शाळेसमोर, लक्ष्मी मंदिर पटांगण, शिवाजी पुतळा पाठीमागे व जनावरांच्या बाजारामध्ये केली आहे, असे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी सांगितले.
ऐतिहासिक वास्तू म्हणून आजरा बँक इमारतीचा समावेश करू नये, असा ठराव विलास नाईक यांनी करण्यास सांगितले. बांधकाम विभागात अनावश्यक व्यक्तींना प्रवेश देऊ नये, बांधकाम विभागातील फाईल व शिक्के गायब होत आहेत. याबाबत दक्षता घ्यावी, असे आनंदा कुंभार यांनी सांगितले.
चर्चेत उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक किरण कांबळे, संभाजी पाटील, शुभदा जोशी यासह सर्व नगरसेवकांनी सहभाग घेतला. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांनी आभार मानले.
- नगरपालिकेची रुग्णवाहिका तीन वर्षांकरिता सतेज स्पोर्टसकडे.
- आजरा शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करणार.
- वाहनांच्या पार्किंगबाबत दोन दिवस माईकवरून माहिती देणार.
- पार्किंग व्यवस्थेबाबत नगरसेवकांचा हस्तक्षेप नाही.