‘दौलत’चा करार रद्दचा ‘कुमुदा’चा निर्णय
By Admin | Published: January 23, 2016 12:34 AM2016-01-23T00:34:21+5:302016-01-23T00:47:41+5:30
अविनाश भोसले यांची माहिती : राजकीय कारस्थानामुळे त्रस्त
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवून ‘दौलत’ सुरू करण्याचा उद्देश होता; पण कोणाच्या तरी इच्छेखातर व महत्त्वाकांक्षेपोटी, राजकीय हेतूने संचालकांविरोधात चाललेला प्रकार पाहता हा कारखाना चालविण्यास घेण्याबाबत जिल्हा बॅँकेशी केलेला करार रद्द करीत आहे, अशी माहिती कुमुदा शुगर्स प्रा. लि.चे डॉ. अविनाश भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली.
‘कुमुदा’ने एक कोटी बयाणा रक्कम भरून भाडेतत्त्वावर चालविण्याबाबत जिल्हा बॅँकेशी करार केला होता. कारखाना ताब्यात घेताना दहा कोटी रुपये व उर्वरित पंधरा कोटी मार्चअखेर भरण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती; पण त्यानंतर ‘दौलत’अंतर्गत राजकारणामुळे अडथळे निर्माण करण्याचे काम काही मंडळींनी केले. जिल्हा बॅँकेचे कर्ज भागविण्यासाठी स्वत:ची मालमत्ता तारण ठेवून कर्ज काढण्याचे नियोजन केले होते; पण काही मंडळींचे ‘दौलत’ सुरूच होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना कंटाळून कारखाना चालविण्यास घेण्याचा निर्णय रद्द करत असून भविष्यात शेतकरी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करून प्रतिसाद दिल्यास याबाबत पुनर्विचार करू, असेही डॉ. भोसले यांनी म्हटले आहे.
‘कुमुदा’ने उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना व रयत साखर कारखाना भाड्याने चालविण्यास घेतले होते. त्यापैकी ‘गायकवाड’ वार्षिक भाड्याने घेतला होता; त्यामुळे तो सोडला आहे. कारखान्याची दीर्घमुदतीच्या कराराच्या अपेक्षेने केलेली भांडवली गुंतवणूक परत मिळत नसल्याने व राज्य बॅँकेने कारखाना उशिरा ताब्यात दिल्याने त्यांच्याकडील दिलेले चेकचे स्टॉप पेमेंट करण्यात आले होते. तसेच रयत कारखान्याचा करार १८ वर्षांचा असून याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ‘रयत’च्या एफआरपी ऊस बिलाबाबतची थकीत रक्कमही साखरेचे दर ढासळल्याने राहिली आहे. सदर रयत कारखाना संचालक मंडळाने कराराचा भंग करून दुसऱ्या कंपनीस चालविण्यास दिला आहे. त्यामुळे थकीत एफआरपी कर्ज मंजुरीमध्ये अडचण येत आहे.
‘दौलत’ चालविण्यास घेण्याची तयारी दाखविल्याने आयर्न शुगर लि. ही स्वतंत्र असणाऱ्या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे राजकीय कारस्थान आहे. अशा वृत्तीमुळे कारखान्याबाबतचा करार रद्द करण्याचा विचार करीत असल्याचे डॉ. भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.