महालक्ष्मी यात्रेचा निर्णय नगरसभेतच
By admin | Published: January 28, 2015 11:22 PM2015-01-28T23:22:38+5:302015-01-29T00:08:12+5:30
गडहिंग्लज : यात्रा समितीचा खुलासा, देवस्थान ट्रस्टचीही संमती
गडहिंग्लज : १४ वर्षांनंतर होणाऱ्या येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा निर्णय व नियोजन नगरसभा घेऊनच करण्यात आला असून, त्यास देवस्थान ट्रस्टनेही संमती दिली आहे. यात्रा समिती व नगरपालिका यांच्या संयुक्त बैठकीतील सूचना विचारात घेऊनच यात्रेची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन दिवसांपूर्वी ‘आम्ही गडहिंग्लजकर’ नावाने एकत्र आलेल्या मंडळींनी येथील प्रांताधिकाऱ्यांकडे यात्रा रद्द करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रा समितीतर्फे हा खुलासा करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, यशवंत पाटील, शिवाजी खणगावे, डॉ. एम. एस. बेळगुद्री, विठ्ठल भमानगोळ, काशिनाथ देवगोंडा, दिलीप माने, सुनील शिंत्रे, बाळासाहेब गुरव, बसवराज आजरी, रमजान अत्तार, राजेश बोरगावे, रामदास कुराडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लोकसहभाग व लोकप्रबोधन
१ ते ७ मे अखेर लोकवर्गणीतूनच होणाऱ्या यात्रेसाठी अवघ्या १५ दिवसांत सुमारे दहा लाखांची वर्गणी जमा झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण, ध्वनी प्रदूषण, सार्वजनिक स्वच्छता, व्यसनमुक्ती, चेंगराचेंगरी, पाकिटमारी आणि कायदा सुव्यवस्था यासंदर्भात लोकप्रबोधनाचेनियोजन यात्रा समितीने केले आहे, अशी माहिती सहसचिव चंद्रकांत सावंत यांनी दिली.
यात्रेला पालिकेचे संपूर्ण सहकार्य : नगराध्यक्षा
महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून सव्वा कोटींचा निधी मिळाला असून, काही कामांना सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे यात्रेसाठी खास निधीची मागणी केली आहे. यात्रा काळात २४ तास पाणीपुरवठ्याबरोबरच आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता यासंदर्भातही खास नियोजन केले असून, यात्रा समितीला पालिकेचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी यावेळी दिली.