‘एमपीएससी’चा निर्णय खुल्या प्रवर्गासाठी अन्यायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:25+5:302021-01-02T04:20:25+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) निर्णय खुल्या प्रवर्गासाठी अन्यायकारक आहे. करिअरबाबत भेदभाव नको. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी ...
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) निर्णय खुल्या प्रवर्गासाठी अन्यायकारक आहे. करिअरबाबत भेदभाव नको. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांपासून दूर जातील, अशा भावना कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी व्यक्त केल्या. ‘एमपीएससी’ने उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल संधीची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार यापुढे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहावेळा परीक्षा देता येणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या.
प्रतिक्रिया
या निर्णयाने ‘एमपीएससी’ने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा देण्याच्या प्रयत्नांवर घाला घातला आहे. हा निर्णय आम्हा विद्यार्थ्यांना अमान्य आहे. राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- प्रतीकसिंह काटकर, अध्यक्ष, मराठा महासंघ विद्यार्थी संघटना
स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची मर्यादा निश्चित करणे हे विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. या परीक्षांमध्ये यश मिळवून करिअर घडविण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणारा हा निर्णय राज्य शासनाने रद्द करावा.
- पवन पवार, मोरेवाडी
या निर्णयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरबाबत भेदभाव करण्यात येऊ नये. कमाल संधीच्या मर्यादेची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांमधील लढाऊ आणि देश बदलविण्याची वृती नाहीशी होईल. विद्यार्थी हिताचा विचार सर्वांनी करावा.
- अनुराधा सटाले, कोल्हापूर
‘एमपीएससी’ने घेतलेला निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या दोन-तीन संधी गेल्यास त्यांच्यावर मानसिक दबाव येईल. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांपासून दूर जातील. हा निर्णय लवकर मागे घेतला नाही, तर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
- ऋतुराज माने, राजारामपुरी
चौकट
‘एमपीएससी’ने वेळापत्रकाचे पालन करावे
सध्या राज्यात शासकीय नोकरीच्या संधींची मुळात कमतरता आहेत. त्यातच अशा पद्धतीने संधी मर्यादित करणे ही जर निवडीच्या प्रक्रियेतील सुधारात्मक उपाययोजना असेल, तर उपलब्ध संधींचा पर्याप्त आणि यथायोग्य कार्यक्षम वापर करता येणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने परीक्षांचे वेळापत्रक, भरती केल्या जाणाऱ्या पदांची संख्या ही वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करणे, परीक्षा वेळेवर घेणे, निकाल वेळेवर लावणे, आदींचे पालन करणे गरजेचे असल्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी सांगितले.
फोटो (३११२२०२०-कोल-प्रतिकसिंह काटकर (विद्यार्थी), पवन पवार (विद्यार्थी), अनुराधा सटाले (विद्यार्थी), ऋतुराज माने (विद्यार्थी)