निरीक्षकांच्या अहवालानंतर महापालिका निवडणुकीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:28+5:302021-03-20T04:23:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक घ्यावी की नको, याचा अंदाज राज्य निवडणूक आयोग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक घ्यावी की नको, याचा अंदाज राज्य निवडणूक आयोग घेणार आहे. त्याकरिता आयोगाचे निवडणूक निरीक्षक तथा साखर आयुक्त शेखर गायकवाड येत्या मंगळवारी (दि. २३ मार्च) कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. निरीक्षकांच्या अहवालावर महापालिकेची निवडणुकीची तारीख अवलंबून राहील.
महानगरपालिकेची निवडणूक आक्टोबर २०२० च्या अखेरीस होऊन नवीन सभागृह १५ नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येणे अपेक्षित होते; परंतु राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरूच राहिल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. या प्रशासकांची मुदत दि. १५ मे २०२१ पर्यंत आहे. तत्पूर्वी ही निवडणूक व्हायला पाहिजे. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. कोल्हापूर शहरातही आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडणूक आयोगाचे निरीक्षक तथा साखर आयुक्त शेखर गायकवाड मंगळवारी कोल्हापूरला भेट देऊन येथील कोरोना परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचा ते आढावा घेतील. जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक, आरोग्य विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून कोरोना परिस्थितीची माहिती घेतील. त्यानंतर अहवाल तयार करून आयोगाला सादर केला जाणार असल्याची चर्चा आहे. या अहवालावर निवडणूक होणार की नाही, हे ठरणार आहे. पालिका प्रशासनाने आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. अंतिम मतदार याद्यासुद्धा तयार झाल्या आहेत. शेवटचा हात म्हणून त्याची केवळ छाननी सुरू झाली आहे.