चित्रपट महामंडळाच्या दोन्ही निवडणुका अखेर रद्द; धर्मादाय उपायुक्तांचा निकाल
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 19, 2022 09:40 PM2022-09-19T21:40:26+5:302022-09-19T21:41:30+5:30
सात दिवसांत अधिकृत निवडणूक कार्यक्रम
इंदुमती गणेश, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची अध्यक्ष मेघराज राजेभोसले व उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी जाहीर केलेल्या दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवत धर्मादाय उपायुक्तांनी त्या रद्द केल्या. कार्यालयाकडूनच अधिकृत निवडणूक पार पाडली जाणार असून पुढील सात दिवसांत तारीख जाहीर केली जाईल. धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी सोमवारी दिलेल्या या निकालामुळे अधिकृत निवडणूक कोणाची, सभासदांनी नेमके कुणी जाहीर केलेल्या निवडणुकीत मतदान करायचे हा पेचप्रसंग सुटला आहे.
दोन्ही गटांच्या निवडणुका वादग्रस्त ठरणाऱ्या असून त्या रद्द करून महामंडळावर प्रशासक नियुक्ती करावी व स्वतंत्र समिती नेमून निवडणुका घ्याव्यात, असे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी प्रसिद्ध केले होते. त्यानुसारच हा निर्णय झाला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे राजेभोसले व यमकर यांनी स्वतंत्र निवडणुका जाहीर केल्या होत्या. एकाच संस्थेच्या एका महिन्यात दाेन निवडणुका हे कायद्यानुसार नव्हते तसेच दोन्ही बाजूंनी आमचीच निवडणूक अधिकृत असल्याचा दावा करत धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे एकमेकांविरोधात तक्रार केली. त्यावर सुनावणी होऊन धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी हा निकाल दिला. त्यानुसार दोन्ही बाजूंची निवडणूक बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे.
आता कार्यालयाच्यावतीने निवडणूक घेतली जाणार असून त्याची तारीख पुढील सात दिवसांत जाहीर करण्यात येईल. धर्मादाय उपायुक्तांनी दिलेल्या या निर्णयामुळे अधिकृत निवडणूक कोणाची, सभासदांनी नेमके कुणी जाहीर केलेल्या निवडणुकीत मतदान करायचे हा पेचप्रसंग सुटला आहे.
आसिफ शेख निवडणूक अधिकारी..
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय निरीक्षक आसिफ शेख यांची तर निवडणूक नियंत्रक अधिकारी म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जुन्या घटनेनुसारच कार्यवाही
चित्रपट महामंडळाची नवीन घटना अजून मंजूर नसल्याने जुन्या घटनेनुसारच निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तीन केंद्रांवर मतदान होईल. त्यात १८ हजार सभासद मतदान करतील.
वकिलांना अधिकार नाही
चित्रपट महामंडळाच्या पॅनेलवर असलेल्या दोन वकिलांची दोन्ही बाजूंनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र, धर्मादाय उपायुक्तांनी या दोन्ही वकिलांना तुम्ही महामंडळाच्या पॅनेलवर असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करू शकत नाही, असे सुनावले.