सोमवारपासून सरसकट दुकाने उघडण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 06:03 PM2021-07-03T18:03:47+5:302021-07-03T18:07:18+5:30
corona virus Kolhapur : येत्या सोमवारपासून (दि. ५) राजारामपुरी परिसर आणि शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्धार राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत शनिवारी झाला. राजारामपुरीतील जनता बझार चौकात ही कोपरा सभा झाली. दुकाने सुरू केल्यानंतर कारवाई करण्यासाठी येणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी अध्यक्षस्थानी होते.
कोल्हापूर : येत्या सोमवारपासून (दि. ५) राजारामपुरी परिसर आणि शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्धार राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत शनिवारी झाला. राजारामपुरीतील जनता बझार चौकात ही कोपरा सभा झाली. दुकाने सुरू केल्यानंतर कारवाई करण्यासाठी येणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला. महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी अध्यक्षस्थानी होते.
गांधी म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. तीन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू, सेवांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्याचा फटका संबंधित दुकानदार, व्यावसायिकांना बसत आहे. आर्थिक समस्या निर्माण झाल्याने दुकानदारांची सहनशीलता संपली आहे. दुकाने बंद असल्याने कामगारांचे पगार, बँकेचे हप्ते, सरकारी कर भरणे व्यापाऱ्यांना अडचणीचे झाले आहे. यामुळे आम्ही चार दिवसांपूर्वी सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता; पण जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार आम्ही दोन दिवस थांबलो. आता कोणाशी चर्चा करणार नाही. सोमवारपासून ९ ते ४ वेळेत सर्व दुकाने उघडतील.
- रक्षा राऊत म्हणाल्या, गेल्या मार्च महिन्यात नव्याने व्यवसाय सुरू केला; पण लॉकडाऊन झाल्याने प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. कर्मचाऱ्यांना पगार कसे द्यायचे? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे सरकारने सहनशीलतेचा अंत न पाहता दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी.
- विनोद कटारिया म्हणाले, आता फार दिवस दुकाने बंद ठेवणे दुकानदारांना शक्य नाही. लॉकडाऊनमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
- माणिक पाटील चुयेकर म्हणाले, दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, ज्यामुळे ग्राहकांची गर्दी होणार नाही.
- श्याम बासरानी म्हणाले, सरकार दंडुकशाहीचा वापर करत विविध घटकांकडून दंड वसूल करीत आहेत. त्या दंडातील रक्कम बेरोजगारांना भत्ता म्हणून द्यावा.
- रणजित पारेख म्हणाले, दीर्घकाळ दुकाने बंद राहिल्याने मालाचा साठा खराब होत आहे. दुकानदार अडचणीत आले आहेत. त्यांचे विविध प्रकारचे कर थकले आहेत. बँकांच्या कर्जाचा हप्ता कसा भरायचा, असा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
- अनिल पिंजानी यांनी दुकाने सुरू करण्यावर सर्वांनी ठाम राहावे, असे आवाहन केले.
या वेळी नीतेश जैन, भरत रावत, अमित लोंढे, आयुष हंजे यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.