लिंब नेसण्याच्या विधीत पाच रुपये दरवाढीचा निर्णय
By Admin | Published: December 7, 2015 12:09 AM2015-12-07T00:09:20+5:302015-12-07T00:18:35+5:30
रेणुका भक्त संघटनेची सभा : बेळगाव प्रशासनाकडून दीड कोटी
कोल्हापूर : सौंदत्ती (कर्नाटक) येथे डोंगरावर यल्लमादेवीच्या यात्रेकरूंना मूलभूत सुविधा देण्यासाठी व त्यांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी १ कोटी २८ लाखांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला. या विकासकामांची तत्काळ सुरुवात केल्याने यंदा भाविकांची काहीअंशी गैरसोय कमी होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या रविवारी झालेल्या सभेत देण्यात आली तसेच जोगुळाभावी कुंडावर यंदा लिंब नेसण्याच्या विधीसाठी दहा वर्षांनंतर पाच रुपये दरवाढ करण्यासही एकमताने मंजुरी देण्यात आली.
साकोली कॉर्नरजवळील भय्यासाहेब परदेशी हॉल येथे कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ज्येष्ठ सदस्य दीपक जाधव यांच्या हस्ते रेणुकादेवीची प्रतिमा पूजन करून सभेला प्रारंभ केला. यावेळी कायमस्वरूपी पिण्याचे पाणी, कुंडांच्या ठिकाणी अंघोळीसाठी शॉवर व महिलांसाठी शौचालय, रस्त्यांच्या कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने सौंदत्ती डोंगरावर यात्रेकरूंची गैरसोय थोडी कमी होणार आहे. याबद्दल बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम यांचे विशेष आभार मानण्यात आले.
संघटनेचे संस्थापक सुभाष जाधव यांनी, जोगुळाभावी कुंडाजवळ यंदा जर स्वच्छ पाणी नसेल तर कोल्हापुरातील जगवाले पुजारी यांनी कोल्हापूर भक्तांकरिता आपले जग रेणुका सागर जलाशय येथे आणून तेथेच लिंब नेसण्याचा विधी करावा, असे आवाहन केले. याला जगवाले पुजारी यांनी मान्यता दिली तसेच जगवाले पुजारी दत्तात्रय पवार यांनी वाढती महागाई लक्षात घेता यंदा लिंब नेसण्याच्या विधीसाठी पाच रुपये दरवाढ करावी, अशी मागणी केली. त्याला सभेत सर्वानुमताने मंजुरी दिली. त्यामुळे दहा वर्षांनंतर ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे यंदा लिंब नेसण्यासाठी ३५ रुपये द्यावे लागणार आहेत.
स्वागत संघटनेचे अध्यक्ष गजानन विभूते यांनी केले, तर संघटनेचे संस्थापक सदस्य अच्चुत साळोखे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार मानले. सभासद प्रभाकर पायमल, बाळासाहेब गंगाजळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर विभागीय एस. टी. महामंडळाचे स. वाहतूक अधीक्षक आर. बी. चव्हाण व संभाजीनगरचे स्थानक प्रमुख विजय हवालदार यांनी यात्रेच्या दराबाबत माहिती दिली.
संघटनेचे सरचिटणीस युवराज मोळे, चिटणीस आनंदराव पाटील, खजानिस मोहन साळोखे, सदस्य अशोकराव जाधव, धनाजी पवळ, दयानंद घबाडे, आनंदराव पाटील, सुनील जाधव, केशव माने, तानाजी बोरचाटे, रमेश बनसोडे, शालिनी सरनाईक, विजया डावरे, राणी मोगले, देवक पुजारी शिवाजीराव आळवेकर, दत्ता पोवार, गज्जू यांच्यासह सभासद उपस्थित होते. (दरपत्रक पान ६ वर)
सर्वतोपरी मदत करू : महापौर
सभेच्या दरम्यान नूतन महापौर अश्विनी रामाणे यांचा संघटनेच्यावतीने विशेष सत्कार कण्यात आला. याप्रसंगी रेणुका भक्तांसाठी महानगरपालिकेच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
विद्यमान संचालक मंडळ कायम
विद्यमान संचालक मंडळ यापुढे २०१५-२० पर्यंत पुढील पाच वर्षांकरिता कायम ठेवण्यास सभेत एकमताने मंजूर देण्यात आली. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ यापुढे कायम राहणार आहे.