उच्चाधिकार समिती बैठकीनंतर ‘सर्किट बेंच’ बाबत निर्णय, बार असोसिएशनचे धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:27 AM2019-03-06T11:27:29+5:302019-03-06T11:31:56+5:30
कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेली बैठक स्थगित करण्यात आली. ही बैठक पुन्हा १२ मार्चला घेण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत येथे घेण्यात आला.
कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेली बैठक स्थगित करण्यात आली. ही बैठक पुन्हा १२ मार्चला घेण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत येथे घेण्यात आला.
कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांची खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने २६ फेब्रुवारीला मुंबईत भेट घेतली. या बैठकीतील माहिती व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने न्यायसंकुलामधील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात मंगळवारी दुपारी बैठक बोलाविण्यात आली होती.
बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी, मुंबईतील बैठकीचा वृत्तान्त सांगितला. सहा जिल्ह्यांतील वकिलांनी नरेश पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार ते सर्किट बेंच देण्यास अनुत्सुक असल्याचे दिसते. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
रविवारी (दि. १०) उच्चाधिकार समितीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत उच्च न्यायालय, औरंगाबाद व नागपूर खंडपीठ आणि गोवा न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोल्हापूर सर्किट बेंचबाबत काय निर्णय होतो, तो पाहूया; त्यानंतर १२ मार्चला बैठक बोलाविण्यात येईल. त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरेल. या बैठकीनंतर सहा जिल्ह्यांची खंडपीठ कृती समितीची बैठक बोलाविण्यात येणार आहे. तत्पूर्वी, मी आज, बुधवारी नागपूर येथे न्यायाधीश यांच्या भेटीसाठी जाणार आहे.
यावेळी अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, उच्चाधिकार समितीची बैठक होऊ दे. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ. त्यामुळे आजची बैठक स्थगित करा. यावेळी अॅड. अशोक पाटील, अॅड. सर्जेराव खोत, आदींनी मते व्यक्त केली.
बैठकीस अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. विजय महाजन, अॅड. विजय पाटील, अॅड. विलासराव दळवी,अॅड. दीपाली पोवार, अॅड. ओंकार देशपांडे, अॅड. स्वाती तानवडे यांच्यासह वकील उपस्थित होते. सेक्रेटरी सुशांत गुडाळकर यांनी स्वागत केले. अॅड. तेहजीज नदाफ यांनी आभार मानले.