औरंगाबाद नामांतरबाबतचा निर्णय समन्वय समिती घेईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:20+5:302021-01-10T04:18:20+5:30

कोल्हापूर : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबत कॉंग्रेस पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम आहे. भिन्न विचारधारा आहे, हे मान्य करूनच महाविकास आघाडी ...

The decision regarding renaming of Aurangabad will be taken by the Coordinating Committee | औरंगाबाद नामांतरबाबतचा निर्णय समन्वय समिती घेईल

औरंगाबाद नामांतरबाबतचा निर्णय समन्वय समिती घेईल

Next

कोल्हापूर : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबत कॉंग्रेस पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम आहे. भिन्न विचारधारा आहे, हे मान्य करूनच महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आक्षेप असण्याचे कारण नाही. नामांतर हा महाविकास आघाडीतील किमान समान कार्यक्रमातील मुद्दा नाही. तिन्ही पक्षांची समन्वय समितीच याचा निर्णय घेईल. हा मुद्दा महापालिका निवडणुकीपुरता असल्याने सरकारच्या स्थिरतेवर अजिबात परिणाम होणार नाही, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

सावंत म्हणाले, औरंगाबाद नामांतरण हा तात्विक मुद्दा आहे. संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत, त्यांना नामांतरणाच्या राजकारणात आणता कामा नये, अशी कॉंग्रेेसची भूमिका आहे, पण निवडणुका आल्यावरच राजकीय पोळी भाजण्यासाठी संभाजी महाराजांचा वापर भाजपकडून केला जातो. आरएसएस आणि मनुवादी भाजपने कायमच संभाजी महाराजांचा दुस्वास केला आहे. स्वत: गोळवलकर गुरुजींनी आपल्या पुस्तकात संभाजी महाराजांचा संभाजी असा एकेरी उल्लेख करत तो बाईलवेडा व दारुड्या होता, असे म्हटले आहे. आज संभाजी महाराजांचा जयजयकार करणारे, त्यांच्या नावाचा वापर करणारे भाजप गोळवलकरांचे साहित्य जाळण्याची हिंमत दाखवणार का, असा सवाल सावंत यांनी केला. एकाच वेळी गोळवलकरांचा उदो उदो आणि संभाजी महाराजांचा जयजयकार कसा चालेल, भाजपने भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

चंद्रकांत पाटील मूठभर राहिले असते

शेतकरी आंदोलनाला मूठभरांचे म्हणून हिणवणारे चंद्रकांत पाटील हे माेदी लाटेत नेते झाले आहेत, नाही तर तेच स्वत: मूठभर राहिले असते, याचा विसर पडू देऊ नये, असा चिमटा सचिन सावंत यांनी काढला.

भाजपचा परतीचा प्रवास सुरू

पदवीधर निवडणुकीत फेराफेरी केल्याचा आरोप करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. मतपत्रिकेवर मतदान घेतले की, भाजप नेस्तनाबूत होतो, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. आता भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आतापासून त्याची मानसिकता तयार करावी, असा खोचक सल्लाही सावंत यांनी दिला.

Web Title: The decision regarding renaming of Aurangabad will be taken by the Coordinating Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.