सामंजस्याच्या भूमिकेचा निर्णय
By admin | Published: May 14, 2015 11:49 PM2015-05-14T23:49:43+5:302015-05-14T23:51:53+5:30
फूर्तादो यांची शिष्टाई : गोवा, मालवण मच्छिमारांच्या बैठकीत तोडगा
मडगाव : मालवण व गोव्यातील मच्छिमारांमध्ये चार दिवस चाललेल्या वादावर गुरुवारी मच्छिमारांच्या समन्वय बैठकीत अखेर तोडगा काढण्यात आला. गोवा मत्स्यविकासमंत्री आवेर्तान फूर्तादो यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली. समन्वय समितीच्या बैठकीत मासळी व्यवहार सुरळीत होण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेण्याचे ठरल्याने मासळीच्या कृत्रिम दुष्काळाच्या वादावर पडदा पडला.
दुपारी दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात फूर्तादो, आमदार बेंजामिन सिल्वा, दोन्ही भागांतील मच्छिमारांचे प्रतिनिधी व वरिष्ठ पोलिसांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक झाली. गोव्याच्या मच्छिमारांनी महाराष्ट्रातील समुद्रात १२ नॉटिकल माईल्सच्या आत येऊन मासेमारी करू नये, जर अशी एखादी बोट आढळल्यास ती स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात दिली जाईल. त्यानंतर बोटमालकांना बोलावून घेण्यात येईल. जी बोट पकडण्यात येईल, त्या बोटीच्या मालकाला गोव्यातील बोटमालक संघटनेने आपसात निर्णय घेऊन दंड आकारावा, अशी मागणी महाराष्ट्रातील मच्छिमारांनी केली.
वेळ्ळीचे आमदार बेंजामीन सिल्वा, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई, पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक, कणकवलीचे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय खरात, श्वजित बुलबुले, पोलीस उपनिरीक्षक मनोहर पाटील, मच्छिमार खात्याचे परवाना अधिकारी सुरेंद्र गावकर, सहायक व्यवस्थापक अधिकारी रवींद्र मालवणकर, वेंगुर्ला बंदर निरीक्षक अमोल ताह्मणकर, भाजप मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर, रविकिरण तोरस्कर, महेश सावजी, रोझरी मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जॉन नोरोन्हा, दिलीप घारे उपस्थित होते. तसेच बेतूल, वास्को व पणजी येथील मच्छिमार संघटनांचे व मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष उपस्थित होते.
समन्वय बैठकीबद्दल समाधानी असल्याचे मालवण भाजपचे तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सांगितले. रविकिरण तोरस्कर यांनी यावेळी मालवण व गोव्यातील मच्छिमारांच्या झालेल्या भांडणामुळे यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ही समन्वय बैठक होती, असे सांगितले. मच्छिमारांमध्ये सौहार्दाच्या वातावरणासाठी ही बैठक यशस्वी ठरल्याचे मत मच्छिमारांच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची महाराष्ट्र व गोव्यातील बोटमालकांनी खबरदारी घ्यावी व अशा घटना घडल्यास महाराष्ट्राच्या किनारी पोलिसांच्या १0९३ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी विजय खरात यांनी केले.
गोवा, कर्नाटकातील बोटींकडून महाराष्ट्रात मासेमारी
मालवणच्या मच्छिमारांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्याच्या मच्छिमार बोटी मालवण येथे समुद्रात महाराष्ट्र सरकारने मच्छिमारांना ठरवून दिलेल्या क्षेत्रात येऊन मासेमारी करीत आहेत. मालवणमध्ये सुमारे २१ हजार मच्छिमारांची कुटुंबे याच व्यवसायावर जगत आहेत. पारंपरिक मच्छिमारांसाठी १२ नॉटिकल माईल्स राखून ठेवली आहे. पर्ससिन नेट बोटी १२ नॉटिकल्स माईल्सच्या बाहेर जाऊन मासेमारी करतात. गोव्यात व कर्नाटकात मासळी संपल्याने गोवा व कर्नाटकातील बोटी महाराष्ट्रात येऊन मासेमारी करीत असल्यामुळे सिंधुदुर्गातील मच्छिमारांना मासळी मिळत नाही. अशा गैरप्रकारांमुळे मालवण व परिसरातील मच्छिीमारांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप या बैठकीत महाराष्ट्रातील मच्छिमारांनी केला.