दलित वस्तीच्या ३६ कोटींचा फैसला आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:12+5:302021-03-09T04:28:12+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची मासिक सभा आज, मंगळवारी हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची मासिक सभा आज, मंगळवारी हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. याच सभेत दलित वस्ती निधीच्या ३६ कोटींच्या निधी वाटपाचा फैसला होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या परिषदेला गतवर्षी १०० वर्षे पूर्ण झाली होती. म्हणून या ठिकाणी समाजकल्याण समितीची सभा घेण्याचे नियोजन सभापती स्वाती सासने यांनी केले होते. मात्र, कोरोनामुळे ही सभा होऊ शकली नाही. त्यामुळे आता आज दुपारी ही सभा माणगाव येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दलित वस्ती निधीचे ३६ कोटी रुपये समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले असून, त्याच्या वितरणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. निधीचे असमान वाटप करण्याचे नियोजन होत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या सभेकडे सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे.