विशेष सभेच्या निर्णयावर ‘केएमटी’ची ठरणार धाव
By Admin | Published: August 3, 2016 01:03 AM2016-08-03T01:03:25+5:302016-08-03T01:03:25+5:30
आर्थिक कोंडी : सेवानिवृत्त कर्मचारी उद्या पदाधिकाऱ्यांना भेटणार
कोल्हापूर : ‘केएमटी’च्या कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी व विमा रक्कम देण्याकरिता महापालिकेकडून आर्थिक तरतूद करण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. ५) महापालिकेची विशेष सभा आयोजित केली आहे. पण तोपर्यंत महानगरपालिका कर्मचारी संघटनेने प्रथम आमचे सुमारे साडेबारा कोटी रुपये देणी द्यावीत; त्यानंतरच इतर देणी द्यावीत, अशी विनंती आयुक्तांकडे केल्यामुळे केएमटी प्रशासनाची पुरती कोंडी झाली आहे. पण याबाबतच्या निर्णयावर विशेष सभेत शिक्कामोर्तब होईल. त्यानंतरच ‘केएमटी’ची धाव ठरणार आहे. दरम्यान, उद्या, गुरुवारी महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, परिवहन समितीचे सभापती यांना केएमटीतील सेवानिवृत्त कर्मचारी देय रकमेबाबत भेटून तरतूद करण्याची मागणी करणार आहेत.
मंगळवारी दुपारी केएमटीतील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची बैठक मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर येथे झाली. सेवानिवृत्त झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांची देणी अद्याप मिळालेली नाहीत. ती मिळण्यासाठी विशेष सभेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या निधीतून निधी मंजूर करावा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन उद्या, गुरुवारी महापौर रामाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या बैठकीस डी. जी. कुलकर्णी, ए. जे. कदम, एस. आर. माळी, एस. एम. साकेकर, आर. टी. पाटील, एस. एन. जाधव, एस. जी. पाटील, एस. बी. माळी, पी. बी. डोर्ले,एस. पी. चिगुक, आदी कर्मचारी उपस्थित होते.