‘आपत्ती व्यवस्थापना’समवेतच्या चर्चेनंतरच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:49+5:302020-12-29T04:23:49+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा आढळलेला नवा विषाणू आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमवेत चर्चा करूनच पदवी, ...
कोल्हापूर : कोरोनाचा आढळलेला नवा विषाणू आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमवेत चर्चा करूनच पदवी, पदविका, विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. सातव्या वेतन आयोगात खरोखरच त्रुटी असतील, तर त्या दूर केल्या जातील. विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याबाबत आंदोलन करण्याऐवजी माझ्याशी चर्चा करावी, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध महाविद्यालये, शाळांचे वर्ग, वसतिगृहे ताब्यात घेण्यात आली होती. ती संबंधित शिक्षण संस्थांच्या पुन्हा ताब्यात दिली आहेत का? याचा आढावा ‘आपत्ती व्यवस्थापन’समवेत चर्चा करून घेणार आहे. त्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय होईल. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, याबाबतची पूर्ण दक्षता घेऊन महाविद्यालयांतील वर्ग सुरू केले जातील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. कोरोना गेल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाऐवजी वेतन आयोगातील त्रुटींबाबत माझ्याशी चर्चा करावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.
चौकट
आरक्षणासाठी जोरदार प्रयत्न
ईडब्लूएसची सवलत ही ऐच्छिक आहे. त्याबाबतची भूमिका उपसमितीने स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार जोरदारपणे प्रयत्न करत असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.