हद्दवाढीचा निर्णय सर्वसहमतीनेच
By admin | Published: July 31, 2016 12:48 AM2016-07-31T00:48:14+5:302016-07-31T00:48:14+5:30
चंद्रकांतदादा पाटील : एकतर्फी रेटारेटी करून चालणार नाही; दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करणार
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा निर्णय ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन सर्वसहमतीने केला जाणार आहे. यासाठी एकतर्फी रेटारेटी केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. या विषयावर उद्या, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री पाटील म्हणाले, हद्दवाढ होण्यासाठी महापालिका व नगरसेवकांनी ग्रामीण भागात जाऊन तेथील जनतेला विश्वासात घ्यावे व आपली भूमिका पटवून द्यावी, असे आपण वारंवार सांगितले आहे. हा निर्णय सर्वसहमतीनेच होणारा आहे. ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊनच तो केला जाईल. यासाठी एकतर्फी रेटारेटी करून चालणार नाही. या विषयावर उद्या, सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस हे समर्थक व विरोधक यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही बाजूंचे प्रत्येकी पाच व दहा लोकप्रतिनिधी असे वीसजण या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत हद्दवाढ का गरजेची आहे? तसेच हद्दवाढ हा प्रश्न फक्त कोल्हापूरचा नसून, राज्यातील इतर महापालिकांचाही आहे, हे मुख्यमंत्री यावेळी सांगणार आहेत.
मुंबईतील आमदारांचे निवासस्थान असलेल्या ‘मनोरा’ या इमारतीचे पुनर्बांधकाम केले जाणार आहे. वीस वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत इतक्या लवकर खराब व्हायला नको होती. आमदारांचीही पुनर्बांधणीसह प्रशस्त सूटची मागणी होती. त्यानुसार बांधकामाचे टेंडर निघाले असून, एक-एक टॉवरचे टप्प्याटप्प्याने बांधकाम केले जाणार आहे. पूर्वी दोन रूमचा एक सूट हा आमदारांसाठी होता. परंतु, तो अपुरा पडायचा. त्यामुळे आमदारांना दुसऱ्या सूटची गरज भासत होती. त्यामुळे आता तीन रूमचा एक सूट बांधला जाईल.
वास्तविक, अधिवेशन हे विविध कायदे करून ते मंजूर करण्यासाठी असते, पण विरोधकांकडून स्वतंत्र विदर्भासह मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे विषय काढून अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याचे काम केले जात आहे. नवीन सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सहकारातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ते आपल्या अनुभवाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून या खात्याला न्याय देतील. (प्रतिनिधी)