दुकाने सुरू राहण्याबाबत आज निर्णय शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:12+5:302021-07-09T04:16:12+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाच्या अटीनुसार आज शुक्रवारी दुपारी चारनंतर अत्यावश्यक वगळता शहरातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्याची मुदत संपत ...
कोल्हापूर : राज्य शासनाच्या अटीनुसार आज शुक्रवारी दुपारी चारनंतर अत्यावश्यक वगळता शहरातील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्याची मुदत संपत आहे. मात्र, मागील आठवड्यात जिल्ह्याचा कमी झालेला पॉझिटिव्ह रेट, वाढलेले लसीकरण आणि मंत्र्यांचे प्रयत्न यामुळे यापुढेही व्यवसाय सुरू राहतील याबाबतचा सकारात्मक निर्णय आज शुक्रवारी रात्रीपर्यंत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाकडे सर्व व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
तीन महिने दुकाने बंदमुळे व्यापाऱ्यांचा वाढता असंतोष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाने कोल्हापूर शहरातील सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यानंतर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट काय येईल, त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज शुक्रवारी दुपारी ४ वाजता या परवानगीची मुदत संपत आहे. शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन आहे. मात्र, मागील सलग तीन आठवडे जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे, लसीकरण वाढले आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवारपासून सुरू होतील, असे जाहीर केले आहे. मात्र, त्याबाबतचे आदेश अजून जिल्हा प्रशासनाला आलेले नाहीत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफदेखील यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यापुढेही सर्व व्यवसाय सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, याचा निर्णय शुक्रवारी सायंकाळनंतरच होणार आहे.
---
व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे : कादंबरी बलकवडे
कोरोनासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, शुक्रवारी मागील आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि आकडेवारी शासनापुढे ठेवली जाते. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होऊन त्यात निर्णय होतो. आज सायंकाळी कोल्हापूरबाबतचा आदेश होईल तरी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे.
----