यड्रावकर यांच्या माघारीबाबत आज निर्णय
By admin | Published: December 11, 2015 01:13 AM2015-12-11T01:13:06+5:302015-12-11T01:14:24+5:30
एक अर्ज पक्षातर्फे, तर एक अपक्ष अर्ज असल्याने प्रलंबित
कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शिरोळ तालुक्यातील शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माघारीबाबत आज, शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केली. यड्रावकर रिंगणातून माघार घेणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही काँग्रेसची आघाडीचा घोळ सुरू होता म्हणून पक्षातर्फे यड्रावकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. पक्षाचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच यड्रावकर माघार घेतील, असे जाहीर केले आहे. गुरुवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा होता. त्यास उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरातून हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील आदी पदाधिकारी गेले आहेत. हे सर्व आज, शुक्रवारी कोल्हापुरात येणार आहेत. स्वत: यड्रावकर हे देखील या सत्कार सोहळ््यास गेले असल्याचे सांगण्यात आले.
यड्रावकर यांनी एक अर्ज पक्षातर्फे व एक अपक्ष म्हणून भरला आहे; परंतु पक्षाने त्यांना ए, बी फॉर्म न दिल्याने त्यांचा तो अर्ज निवडणूक कार्यालयाने विचारातच घेतला नाही. अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मंजूर झाला आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे व त्यानुसार कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे त्या आघाडीनुसार यड्रावकर हे अर्ज माघार घेतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.