जोतिबा’सह अन्य यात्रांच्या बंदीबाबत तत्कालीन परिस्थितीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:26 AM2020-03-13T11:26:59+5:302020-03-13T11:28:28+5:30

यात्रा, जत्रा, उरूस, उत्सव अशा गर्दीच्या ठिकाणी जाण्याविषयी स्वत:वरच बंधन घालावे. स्वयंशिस्तीला प्राधान्य द्यावे. मी आणि माझे कुटुंब, शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी अशा पाच स्तरांवर स्वच्छताविषयी तसेच कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.

Decisions on the current travel ban, including Jotiba | जोतिबा’सह अन्य यात्रांच्या बंदीबाबत तत्कालीन परिस्थितीत निर्णय

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी कोरोना प्रतिबंधासंदर्भात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी योगेश साळे, मीनाक्षी गजभिये, अमन मित्तल, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. अभिनव देशमुख, भाऊसाहेब गलांडे, प्रसाद संकपाळ, डॉ. बी. सी. केम्पीपाटील उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : ‘कोरोना’बाबत प्रशासन सतर्क : स्थानिक स्वराज्य संस्थांनी जनजागृती करावी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

कोल्हापूर : कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र त्याबद्दल आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. जोतिबा यात्रेला अद्याप वेळ असून, त्यासह विविध यात्रांवरील बंदीबाबतचा निर्णय तत्कालीन परिस्थितीनुसार घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी येथे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. प्रत्येकानेच आपल्या क्षेत्रात जबाबदारीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह येथे राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात कोरोनासंबंधातील पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच प्रतिसाद याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन समिती आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, आपण जागरूक व्हायचे आहे आणि शेजाऱ्यालाही जागरूक करायचे आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, आदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी गावातील प्रमुख चौकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करणारे फलक तत्काळ लावावेत. यात्रा, जत्रा, उरूस, उत्सव अशा गर्दीच्या ठिकाणी जाण्याविषयी स्वत:वरच बंधन घालावे. सध्या स्वयंशिस्तीला प्राधान्य द्यावे. मी आणि माझे कुटुंब, शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी अशा पाच स्तरांवर स्वच्छताविषयी तसेच कोरोनाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.

ते पुढे म्हणाले, प्रत्येकाने स्वत:हून तपासणी करावी. त्याचबरोबर शंका आल्यास उपचारासाठी तपासणीसाठी प्रवृत्त करावे. लपवून ठेवू नये. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या स्तरावर १० ते १५ खाटांची विलगीकरण आणि अलगीकरण कक्षाची व्यवस्था करावी. वैद्यकीय व्यावसायिकांनी येणाºया रुग्णांची लक्षणे तपासून हिस्ट्रीची नोंद घ्यावी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ कळवावे. आठवडी बाजार बंदीबाबत पोलिसांकडून अहवाल घेऊन पुढील कारवाई केली जाईल.

प्रसाद संकपाळ यांनी सर्वांचे स्वागत करून संगणकीय सादरीकरण केले.
यावेळी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, तालुका आरोग्याधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच उद्योग, विविध बाजार, चित्रपटगृहे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 

  • प्रत्येकाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे : जिल्हाधिकारी

बाहेरून घरी आल्यावर हातपाय धुण्याची भारतीय परंपरा आहे. त्याचबरोबर जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणे ही परंपराही आहे. त्यामुळे स्वत:च्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणांचीही स्वच्छता केली जावी. हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडून नमस्कार करणे हे आपल्या परंपरेने दिले आहे. सध्या याच परंपरेचा वापर प्रत्येकाने कटाक्षाने करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

  • आरोग्यदूत व्हावे : कलशेट्टी

महापालिका आयुक्त कलशेट्टी म्हणाले, प्रत्येकाने प्रथम आरोग्यदूत होण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणे कशी कमी करता येतील त्यासाठी प्रयत्न करावा. भीती बाळगण्याची गरज नाही. गर्दी टाळणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात जाणीवजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘आरोग्यदूत’ बनून काम करा.
 

  • ‘कोरोना’ची माहिती लपवू नये : देशमुख

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, कोरोनाबाबत प्रात्यक्षिक करणे आवश्यक आहे. प्रत्येक ताप आणि असणारा खोकला हा कोरोना नसतो; त्यामुळे त्याची भीती ठेवू नये. मात्र माहिती लपवू नये. स्वत:हून पुढे येऊन तपासणी करावी. स्वच्छ रुमाल, स्कार्फ जरी बांधला तरी चालू शकतो. गरज नसेल तर बाहेर पडू नये. प्रत्येकाने स्वत:वर बंधन घालून घ्यावे. निर्जंतुकीकरण द्रावणे, त्याचबरोबर साबणाने स्वच्छ हात धुवावेत.

 

 

Web Title: Decisions on the current travel ban, including Jotiba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.