हातकणंगले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Published: September 23, 2015 11:38 PM2015-09-23T23:38:13+5:302015-09-24T00:04:24+5:30

आढावा बैठक : पिकांची अवस्था वाईट; आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी

Declare drought in Hatkanangle taluka | हातकणंगले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

हातकणंगले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Next

हातकणंगले : तालुक्यामध्ये खरीपाच्या पिकाची अवस्था वाईट आहे. पीक आणेवारी ५० टक्क्यापेक्षा खाली आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवली आहे. अशा स्थितीमध्ये तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह गावोगावच्या सरपंचांनी केली. तालुक्यातील ६२ गावातील आढावा बैठकीमध्ये करणेत आली. पंचायत समितीच्या बचत भवन हॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. सुजित मिणचेकर होते.प्रास्ताविक गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी केले. सभापती राजेश पाटील यांनी पाणीटंचाईचा आढावा घेताना तालुक्यात खरीपाचे उत्पादन ५० टक्के पेक्षा खाली आहे. पावसाअभावी पिके करपली आहेत. विहिरी, बोअरलाही पाणी नाही. वारणा आणि पंचगंगा नदीवरून पाणी उपसा करणारी मोजकीच गावे आहेत. हालोंडी-तासगावपासून मजले-तारदाळपर्यंतची वीस-पंचवीस गावे माळरानावर असून त्यांना बारमाही पाणीटंचाई भासते. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तालुक्याची सध्याची स्थिती पाहता तालुक्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे. तरी तालुका दुष्काळी जाहीर करून न्याय द्यावा, अशी मागणी या बैठकीत केली.जि. प. सदस्य शहाजी पाटील यांनीही २३ गावामध्ये भीषण पाणीटंचाई आहे. त्यांना पाणी देण्यासाठी कायमची उपाययोजना आवश्यक असलेचे मत व्यक्त केले. उसभापती प्रभावती पाटील, सदस्य रंगराव खांडेकर आणि विविध गावच्या सरपंचांनी तालुक्यातील पाणी स्थिती आणि जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था पाहता यावर्षी तालुक्यातील दुष्काळी स्थिती पाहता शेतकरीवर्गाची पीक कर्जे आणि इतर कर्जे माफ करण्याची मागणी केली.
पाणीपुरवठाचे उपअभियंता बाळासाहेब कांबळे म्हणाले, खासगी विहिरी, उपसा सिंचन योजनासह इतर पाण्याचे स्त्रोत शासनाच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेऊन नागरिकांना पाणीपुरवठा कारावा लागणार असल्याचे मत व्यक्त केले.
सुजित मिणचेकर यांनी तालुक्याच्या उत्तर-दक्षिण विस्ताराचा विचार करून मध्यवर्ती केंद्रीय पाणी योजना राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून भविष्यात तालुक्यासाठी दोनशे ते तीनशे कोटीची एकच पाणी योजना सुरू करण्यासाठी विचार असल्याचे मत व्यक्त केले.
आढावा बैठकीला जि. प. सदस्य सौ. प्रमोदिनी जाधव, डॉ. सुमन मिणचेकर, पंचायत समिती सदस्य संतोष भोरे, सौ. मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

तालुक्यातील दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाई आढावा बैठकीसाठी तालुका पंचायत समितीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला २२ पंचायत सदस्यांपैकी चार आणि ११ जि. प. सदस्यांपैकी २ सदस्य हजर होते. पाणीटंचाईचे गांभीर्य १८ पंचायत समिती आणि ९ जि. प. सदस्यांना नाही हे या बैठकीमध्ये दिसून आले.

Web Title: Declare drought in Hatkanangle taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.