ऊसाची एफआरपी लवकर जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:48+5:302021-06-22T04:16:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आगामी २०२१-२२ या हंगामातील ऊसाची एफआरपी राज्य व केंद्र सरकारने लवकर जाहीर करावी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आगामी २०२१-२२ या हंगामातील ऊसाची एफआरपी राज्य व केंद्र सरकारने लवकर जाहीर करावी, या मागणीसाठी सोमवारी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हातात ऊसाचे कांडके घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे म्हणाले, यापूर्वी केंद्र सरकार ऊसाची एफआरपी जाहीर करत होते, मात्र २२ ऑक्टोबर २०२०च्या अधिसूचनेनंतर तो अधिकार राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने एफआरपी लवकर जाहीर करावी, ही आमची मागणी आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेतेमंडळीच्या ताब्यात साखर कारखाने आहेत. त्यामुळे त्यांचे एकमेकांशी हितसंबंध जोडल्याने ऊसाच्या एफआरपीवर कोणीही बोलणार नाहीत.
मुळात रासायनिक खतांच्या दरात झालेली वाढ, इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचा दर अगोदर कळला पाहिजे.
शेतकरी संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. प्रगती चव्हाण, टी. आर. पाटील, बाळ नाईक, उत्तम पाटील, ज्ञानदेव पाटील, राजू खुर्दाळे, अनिता निकम, गुणाजी शेलार, अजित पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : साखर कारखान्यांच्या आगामी हंगामातील ऊसाची एफआरपी जाहीर करा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून हातात ऊसाचे कांडके घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. (फोटो-२१०६२०२१-कोल-ऊस आंदोलन) (छाया- आदित्य वेल्हाळ)